Join us  

आयुष्यातील पहिला शॉर्ट दिल्यानंतर चालता हो म्हणत मनोज वाजपेयीचा करण्यात आला होता अपमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 5:41 PM

पहिल्या शॉटनंतर इथून चालता हो, असे सांगून अक्षरश: मला सेटवरून हाकलून लावले गेले होते. माझा चेहरा हिरोसारखा नव्हता. त्यामुळे मोठ्या पडद्यावर मी काम करूच शकत नाही, असे मला वाटायला लागले होते असे मनोजने एका मुलाखतीत सांगितले होते.

ठळक मुद्देएवढेच नव्हे तर त्याच्या आयुष्यात त्याने दिलेल्या पहिल्या शॉर्टनंतर त्याला चालता हो... म्हणत त्याचा अपमान करण्यात आला होता.

बॉलिवूड अभिनेता मनोज वाजपेयीने वेगवेगळ्या भूमिका साकारून रसिकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे. १९९८ मध्ये प्रदर्शित राम गोपाल वर्मा यांच्या ‘सत्या’ने मनोज वाजपेयी या नावाला नवी ओळख दिली. या चित्रपटासाठी त्याला सर्वोत्कृष्ट सहअभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. यावर्षी देखील राष्ट्रीय पुरस्काराने त्याला सन्मानित करण्यात आले आहे.

मनोजच्या आयुष्यात एक काळ असाही होता, जेव्हा लोक त्याच्याकडे ढुंकूनही बघत नव्हते. एका मुलाखतीत खुद्द मनोजने ही खंत बोलून दाखवली होती. त्याने सांगितले होते की, ‘सत्या या चित्रपटाच्याआधीचा तो काळ होता, जेव्हा मीडिया मला जराही भाव द्यायचा नाही. मी कुठल्याही पार्टीला गेलो आणि मीडियाचे कॅमेरे चुकून माझ्याकडे वळले तरी लगेच ते दुसऱ्या बाजूला वळवले जायचे.’

एवढेच नव्हे तर त्याच्या आयुष्यात त्याने दिलेल्या पहिल्या शॉर्टनंतर त्याला चालता हो... म्हणत त्याचा अपमान करण्यात आला होता. याविषयी मनोजने सांगितले होते की, माझ्या स्ट्रगलिंगच्या काळात एका सहाय्यक दिग्दर्शकाने माझा फोटो फाडून फेकून दिला होता. एका दिवसात मी तीन प्रोजेक्ट गमावले होते. पहिल्या शॉटनंतर इथून चालता हो, असे सांगून अक्षरश: मला सेटवरून हाकलून लावले गेले होते. माझा चेहरा हिरोसारखा नव्हता. त्यामुळे मोठ्या पडद्यावर मी काम करूच शकत नाही, असे मला वाटायला लागले होते. मी मुंबईत पाच मित्रांसोबत एका खोलीत राहात होता. ती चाळीतली छोटीशी रूम होती. कधी साधा वडापाव खाण्यासाठी पैसे नसायचे, मग घराचे भाडे कसे देणार. मात्र माझ्या पोटातली भूक माझ्या यशाच्या भूकेला मारू शकत नव्हती. अखेर मला महेश भट्ट यांच्या टीव्ही सीरिजमध्ये काम करण्याची संधी मिळाली. त्यावेळी एका एपिसोडसाठी दीड हजार रुपये मिळायचे.

सत्या या चित्रटामुळे मनोज वाजपेयीला प्रचंड लोकप्रियता मिळाली. त्यानंतर अमृता प्रीतम यांची गाजलेली कादंबरी ‘पिंजर’वर आधारित ‘पिंजर’ याच नावाच्या चित्रपटासाठी मनोजला दुसरा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. प्रकाश झा यांच्या ‘राजनीति’ या चित्रपटानंतर मनोज वाजपेयीच्या नावाची चर्चा होऊ लागली.

टॅग्स :मनोज वाजपेयी