Join us

जाणून घ्या कसा होता शशी कपूर यांचा अभिनयप्रवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2017 20:42 IST

हिंदी चित्रपटसृष्टीचा चॉकलेट हिरो अशी शशी कपूर यांची ओळख होती.त्यांच्या दिसण्यावर त्या काळात मुली फिदा होत्या. ते तरुणींच्या गळ्यातला ...

हिंदी चित्रपटसृष्टीचा चॉकलेट हिरो अशी शशी कपूर यांची ओळख होती.त्यांच्या दिसण्यावर त्या काळात मुली फिदा होत्या. ते तरुणींच्या गळ्यातला ताईत बनले होते असे म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही. हॅडसम हिरो अशी त्यांची बॉलिवूडमध्ये ओळख होती.शशी कपूर हे पृथ्वीराज कपूर यांचे तिसरे सुपुत्र. 18 मार्च 1938 साली कोलकतामध्ये त्यांचा जन्म झाला. त्यांचे पाळण्यातले नाव बलबीरराज असे होते. पण पुढे शशी या नावानेच त्यांनी बॉलिवूडमध्ये त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली.मुंबईतल्या मांटुग्याच्या डॉन बॉस्को शाळेत शशी कपूर यांचे शिक्षण झाले. त्यांचे वडील पृथ्वीराज कपूर हे एक प्रसिद्ध अभिनेते होते. पृथ्वी थिएटर या वडिलांच्या थिएटर कंपनीमधूनच त्यांनी त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली. पृथ्वी थिएटरच्या शकुंतला या नाटकाने त्यांच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात झाली. त्यानंतर 1945 मध्ये के.एल.सहगल आणि सुरैय्या यांच्या तदबीर सिनेमात त्यांनी शशीराज नावाची भूमिका साकारली. त्यानंतर राज कपूर यांच्या आग आणि आवारा या सिनेमात शशी कपूर यांनी राज कपूर यांच्या बालपणाची भूमिका साकारली.तदबीरपासून ते 1952च्या दानापानीपर्यंत शशी कपूर यांनी बालकलाकार म्हणून 11 सिनेमांमध्ये काम केले. त्यांनी रुपेरी पडद्यावर साकारलेला छोटा अशोककुमार आणि छोटा राज कपूर साऱ्यांना भावला. त्यानंतर शशी कपूर त्यांचे वडील पृथ्वीराज कपूर यांच्या थिएटरच्या कामात रस घेऊ लागले. पुढे मोठा भाऊ राज कपूर यांची प्रमुख भूमिका असलेल्या श्रीमान सत्यवादी आणि दुल्हा दुल्हन या सिनेमांसाठी त्यांनी साहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम पाहिले. शशी कपूर यांचा संबंध कपूर खानदानाशी असल्याने त्यांना साईन करण्यासाठी निर्माता-दिग्दर्शकांची त्याकाळी रांग लागायची. मात्र पृथ्वी थिएटरमध्ये शेक्सपियरसारख्या भूमिका त्यांनी साकारल्या असल्याने त्यांच्या डोक्यात आदर्श सिनेमा आणि भूमिकेची कल्पना होती. मी अभिनेता आहे, नाचणारा डोंबारी नाही असे सांगत ते चित्रपटात काम करण्यासाठी नकार द्यायचे. मात्र काही काळानंतर त्यांचा विचार बदलला आणि त्यांनी यश चोप्रा यांच्या 'धर्मपुत्र' सिनेमाद्वारे त्यांच्या बॉलिवूड कारकिर्दीला सुरुवात केली. शशी कपूर यांच्या अभिनयासोबतच त्यांच्या नृत्यकौशल्यावर देखील लोक प्रचंड फिदा झाले. शशी कपूर यांनी अनेक रोमँटिक सिनेमात काम केलं. सूरज प्रकाश दिग्दर्शित जब जब फूल खिले या सिनेमातील नंदा आणि शशी कपूर यांच्या जोडीची चांगलीच चर्चा झाली होती. 'जब जब फूल' खिले हा चित्रपट प्रचंड यशस्वी ठरला आणि या चित्रपटानंतर शशी कपूर यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. त्यांना या चित्रपटानंतर अनेक चित्रपटांच्या ऑफर येऊ लागल्या. त्या काळात ते अनेक शिफ्टमध्ये काम करत असत. एका स्टुडिओतून दुसऱ्या स्टुडिओत त्यांची धावाधाव व्हायची. त्यामुळे सत्यम शिवम सुंदरम या चित्रपटाच्या वेळी राज कपूर त्यांना रागाने त्यांना आप एक्टर हो या टॅक्सी असंही बोलले होते. त्यामुळे शशी कपूर यांना टॅक्सी कपूर असे मस्करीत म्हटले जायचे. हिंदीसोबत इंग्रजी सिनेमात देखील त्यांनी काम केले. द हाऊसहोल्डर, शेक्सपिअरवाला, बॉम्बे टॉकी, हिट एंड डस्ट असे त्यांचे इंग्रजी सिनेमे भारतातच नाहीतर परदेशातही गाजले. शशी कपूर यांनी जुनून, कलयुग, विजेता यांसारख्या चित्रपटांची निर्मिती देखील केली. शशी कपूर यांचे वैशिष्ट्य म्हणजे ते त्यांच्या चित्रपटाच्या मुख्य कलाकारांसोबत सगळ्या टेक्निशियन टीमची फाईव्ह स्टार हॉटेल मध्ये राहाण्याची सोय करत असत. कलाकार, टेक्नियन्समध्ये भेदभाव करणे त्यांना अजिबातच आवडत नसे. या त्यांच्या स्वभावामुळे त्यांना अनेकवेळा नुकसान सहन करावे लागत असे.शशी कपूर यांचा जेनिफर केंडाल यांच्यासोबत विवाह झाला होता. या दोघांची प्रेमकथा प्रचंड रंजक आहे. 1956 मध्ये त्यांची जेनिफर यांच्यासोबत ओळख झाली. शशी पृथ्वी थिएटरमध्ये काम करत होते तर जेनिफर तिचे वडील जॉफ्री केंडाल यांच्यासोबत कोलकतामध्ये नाटकाच्या ग्रुपसोबत आल्या होत्या.काहीच काळात ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. पण या दोघांच्या नात्याला कपूर कुटुंबीयांकडून विरोध करण्यात आला. पण शशी कपूर यांची वहिनी गीता बाली यांनी त्यांच्या नात्याला पाठिंबा दिला आणि जुलै 1958 मध्ये त्यांनी लग्न केले.त्यांनी लग्नानंतर अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले.1984 मध्ये जेनिफर यांचे कर्करोगाने निधन झाले.जेनिफर यांच्या निधनानंतर शशी कपूर यांना प्रचंड धक्का बसला. आपल्या नृत्यासाठी प्रसिद्ध असलेले, सतत हसतमुख असलेले शशी कपूर गेल्या अनेक वर्षांपासून व्हीलचेअरवरच होते. त्यांना या अवस्थेत पाहून त्यांच्या फॅन्सना प्रचंड दुःख होत असे. यश मिळवूनही कायम माणुसकी आणि साधेपणा जपणारा खरा माणूस अशी त्यांची ओळख एका कार्यक्रमात शबाना आझमी यांनी करून दिली होती. ही ओळख त्यांच्या व्यक्तिमत्त्वासाठी अगदी योग्यच होती असेच म्हणावे लागेल.