Join us  

Krisha Raj Kapoor Funeral: कृष्णा राज कपूर यांच्या अंत्यदर्शनाला या सेलिब्रेटींनी लावली हजेरी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 01, 2018 4:43 PM

सोमवारी सकाळी कृष्णा राज कपूर यांनी अंतिम श्वास घेतला. त्या ८७ वर्षांच्या होत्या. कृष्णा कपूर यांना अनेक वर्षांपासून श्वास घेण्यास त्रास जाणवत होता. त्यांच्या अंत्यदर्शनाला बॉलिवूडमधील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली.

बॉलिवूडचे शो मॅन दिवंगत राज कपूर यांच्या पत्नी कृष्णा राज कपूर यांचे मुंबईत दीर्घआजाराने निधन झाले. दीर्घकाळापासून कृष्णा राज कपूर आजारी होत्या. सोमवारी सकाळी त्यांनी अंतिम श्वास घेतला. त्या ८७ वर्षांच्या होत्या. कृष्णा कपूर यांना अनेक वर्षांपासून श्वास घेण्यास त्रास जाणवत होता. त्यांच्या अंत्यदर्शनाला बॉलिवूडमधील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली. अनिल कपूर, त्याची पत्नी सुनीता कपूर, संजय कपूर, त्याची पत्नी महीप कपूर, प्रेम चोप्रा, काजोल, राणी मुखर्जी, सैफ अली खान, टीना अंबानी, अमिताभ बच्चन यांसारख्या अनेक कलाकारांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचे अंतिम दर्शन घेतले. यावेळी त्यांच्या कुटुंबातील रणधीर कपूर, राजीव कपूर, रिमा जैन, करिना कपूर, करिश्मा कपूर, आदर जैन उपस्थित होते. कृष्णा राज कपूर यांचे सुपुत्र ऋषी कपूर हे सध्या उपचार घेण्यासाठी अमेरिकेत असल्याने ते अंतिम दर्शनासाठी मुंबईत येऊ शकणार नाहीत. त्यांचा मुलगा अभिनेता रणबीर कपूर त्यांच्यासोबतच अमेरिकेला होता. पण तो मुंबईत येण्यासाठी रवाना झाला आहे. ऋषी कपूर आजारी असल्याने उपचारासाठी अमेरिकेला जात असल्याचे त्यांनी सोशल मीडियाद्वारे नुकतेच कळवले होते. 

कृष्णा राज कपूर यांच्यावर चेंबूरमधील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. कृष्णा यांना गत आॅगस्टमध्ये मुंबईस्थित एका रूग्णालयात भरती करण्यात आले होते. काही दिवसांच्या उपचारानंतर त्यांना रूग्णालयातून सुट्टी मिळाली होती. कृष्णा यांना पाच मुले. यात रणधीर कपूर, राजीव कपूर, ऋषी कपूर, रिमा व रितू यांचा समावेश आहे. करिना कपूर, करिश्मा कपूर , रणबीर कपूर आणि रिद्धिमा कपूर यांच्या त्या आजी होत्या. ८७ वर्षांच्या वयातही कृष्णा बऱ्याच अ‍ॅक्टिव्ह होत्या. फॅमिली पार्टी आणि अनेक चित्रपटाच्या प्रीमिअरला त्या हजेरी लावत. १९८८ मध्ये राज कपूर यांचे निधन झाले़ यानंतर कृष्णा यांनीच संपूर्ण घराला आधार दिला.

बॉलिवूडच्या अनेकांनी कृष्णा राज कपूर यांना सोशल मीडियावरून श्रद्धांजली वाहिली आहे. अभिनेत्री रवीना टंडन, अनुपम खेर यांनी ट्विटरवर कृष्णा राज कपूर यांच्या निधनावर दु:ख व्यक्त केले आहे.

 

 

 

 

 

 

 

टॅग्स :राज कपूरअमिताभ बच्चनकरिना कपूर