Join us  

अमिताभ बच्चन यांना शालेय जीवनात मिळाला होता चांगलाच चोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2020 11:29 AM

अमिताभ यांनी केलेली गोष्ट ही चुकीची असल्याचे शाळेच्या मुख्याध्यापकांनी त्यांना सांगितले होते.

ठळक मुद्देअमिताभ यांनी सांगितले की, मी शाळेत असताना एक साप आम्हा चार मित्रांना दिसला होता. तो साप आमच्यावर हल्ला करायला येत होता. हे पाहाताच आम्ही तिथून धूम ठोकली.

कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमाच्या प्रत्येक सिझनला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमिताभ बच्चन करतात. अमिताभ बच्चन या कार्यक्रमातील स्पर्धकांसोबत मनसोक्त गप्पा मारतात. आपल्या आयुष्यातील अनेक किस्से ते स्पर्धकांना सांगतात. नुकताच त्यांनी एका भागात त्यांच्या शालेय जीवनातील एक रंजक किस्सा सांगितला. 

कौन बनेगा करोडपती १२ च्या शुक्रवारी प्रसारित झालेल्या कर्मवीर स्पेशल भागात भोपाळमधील जहांगीराबाद येथील एका शाळेच्या शिक्षिका उषा खरे यांनी उपस्थिती लावली होती. तसेच महाराष्ट्रातील सोलापूर भागात राहाणारे आणि ग्लोबल टीचर पुरस्कार विजेते रणजीत डिसले हजर होते. त्यांना हॉट सीटवर अभिनेता बोमन इराणी यांनी साथ दिली. या तिघांशी गप्पा मारताना अमिताभ बच्चन यांनी आपल्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला. या कार्यक्रमादरम्यान अमिताभ बच्चन यांनी बोमन इराणी यांना विचारले की, तुम्ही शाळेत असताना खोडकर होता की आज्ञाधारक... त्यावर बोमन यांनी सांगितले की, माझ्या आईने माझे पालनपोषण खूपच चांगल्या रितीने केले आहे. मी लहान असताना मला बोलायला खूप त्रास होत होता. मी अडखळत बोलायचो. तसेच बोलताना माझी जीभ सारखी बाहेर यायची. त्यामुळे सगळी मुलं माझी टर उडवायचे. मला याचे खूप वाईट वाटायचे. पण स्टेजवर गात असताना माझ्यात एक वेगळा आत्मविश्वास निर्माण व्हायचा. त्यामुळे स्टेजवर परफॉर्म करायला मला खूप आवडायचे. मला स्पीच थेरिपिस्टला दाखवल्यानंतर माझ्यातील आत्मविश्वास आणखी वाढू लागला. माझी आई माझ्यासाठी प्रेरणास्थान आहे. तिने कधीच मला कोणती गोष्ट करण्यास मज्जाव केला नाही. मला चित्रपट पाहायला आवडायचे. त्यामुळे ती मला नेहमीच चित्रपट पाहाण्याची परवानगी द्यायची. पण चित्रपट पाहाताना चांगले चित्रपट पाहा... असे ती आवर्जून सांगायची. 

बोमनचा हा किस्सा ऐकल्यावर माझे शालेय जीवन कसे होते हे तुम्ही विचारलेच नाही असे अमिताभ बोमन यांना म्हणाले. या गप्पांच्या ओघात अमिताभ यांनी सांगितले की,  मी शाळेत असताना एक साप आम्हा चार मित्रांना दिसला होता. तो साप आमच्यावर हल्ला करायला येत होता. हे पाहाताच आम्ही तिथून धूम ठोकली. तेवढ्यात आम्हाला एक शिकारी दिसला. आम्ही त्याला लगेचच त्या सापाबद्दल सांगितले. त्याने बंदुकीने त्या सापाला मारले. आम्ही काही तरी मोठी गोष्ट केली असल्याचे आम्हाला वाटले आणि मी हॉकी स्टिकवर त्या मृत सापाला गुंडळले आणि तसाच शाळेत घेऊन गेलो. हे पाहून आमचे प्रिन्सिपल चिडले आणि त्यांनी मला चांगलाच चोप दिला. मी चुकीची गोष्ट केली असल्याचे त्यांनी मला समजावून सांगितले. माझ्या शालेय जीवनातील असे अनेक मजेदार किस्से आहेत. 

टॅग्स :अमिताभ बच्चनकौन बनेगा करोडपती