Join us  

संजू या चित्रपटातील कमलेश ही व्यक्तिरेखा आधारित आहे संजूच्या खऱ्या आयुष्यातील या मित्रावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2018 3:43 PM

संजू या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आल्यापासून या चित्रपटात दाखवण्यात आलेल्या संजयच्या मित्राची व्यक्तिरेखा कुमार गौरव अथवा गुलशन ग्रोव्हरवर बेतलेली असल्याची चर्चा रंगली होती.

संजू या चित्रपटात संजय दत्तच्या आयुष्यातील अतिशय महत्त्वाच्या व्यक्तींचा उल्लेख करण्यात आला आहे. संजूच्या आयुष्यात त्याचे वडील सुनील दत्त, पत्नी मान्यता यांच्यासोबत आणखी एका व्यक्तीला प्रचंड महत्त्व आहे, ते म्हणजे त्याचा एक मित्र. संजू या चित्रपटात त्याच्या या मित्राच्या व्यक्तिरेखेत कमलेशला दाखण्यात आले आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आल्यापासून हा कमलेश म्हणजे संजयचा लाडका मित्र कुमार गौरव अथवा गुलशन ग्रोव्हर असल्याची चर्चा रंगली होती. पण कमलेश ही व्यक्तिरेखा त्यांच्या दोघांवर देखील बेतलेली नाही.कमलेश ही व्यक्तिरेखा संजयचा सगळ्यात जवळचा मित्र परेश गहलानीवर आधारित आहे. कमलेश या व्यक्तिरेखेचे बोलणे, चालणे हे परेशसारखे नसले तरी परेश आणि या व्यक्तिरेखेत अनेक सार्धम्य आहे. परेश गेल्या कित्येक वर्षांपासून आपल्या कुटुंबियांसोबत अमेरिकेत राहात आहे. त्याचे कुटुंब पूर्वी शिकागो मध्ये राहात होते. पण गेल्या अनेक वर्षांपासून ते लॉस एन्जेलिसमध्ये राहात आहेत. संजय आणि परेशची पहिली भेट ही न्यूयॉर्कमध्ये झाली होती आणि पहिल्याच भेटीत त्यांच्यात घट्ट मैत्री निर्माण झाली. संजय त्याला प्रेमाने परया अशी हाक मारतो. परेश आजवर संजयच्या प्रत्येक संकटात त्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहिला आहे. परेश हा एक मोठा व्यवसायिक असून त्याने त्याच्या मेहनीतवर आज व्यवसाय क्षेत्रात त्याचे प्रस्थ निर्माण केले आहे. या चित्रपटात विकी कौशल परेशची व्यक्तिरेखा साकारत असल्याने त्याने चित्रीकरणाच्या दरम्यान परेशची भेट देखील घेतली होती. संजय दत्तच्या संजू या चित्रपटाच्या प्रिमियरसाठी खास अमेरिकेहून परेश मुंबईत आला होता. पण परेश मीडियापासून दूर राहाणेच पसंत करतो. संजू या चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. रिलीजनंतरच्या दोन दिवसांत या चित्रपटाने अनेक विक्रम प्रस्थापित केलेत. केवळ दोन दिवसांत या चित्रपटाने ७३ कोटी ३५ लाखांची विक्रमी कमाई केली आहे. अ‍ॅडव्हान्स बुकिंग आणि चित्रपटगृहांबाहेर लागलेले हाऊसफुलचे बोर्ड यावरून हा चित्रपट यंदाचा सर्वात मोठा ‘ओपनर’ ठरेल, याचा अंदाज आधीच आला होता. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने ३४.७५ कोटींचा बिझनेस केला. दुसऱ्या दिवशीही या चित्रपटाने ३८.६० कोटी रूपये कमावले. पहिल्या दोन दिवसांतच संजूने ७३.३५ कोटींचा गल्ला जमवला आहे.

टॅग्स :संजू चित्रपट 2018संजय दत्तगुलशन ग्रोव्हर