Join us  

गंगुबाई काठियावाडी चित्रपटासंदर्भात कामाठीपुरामधील रहिवाशांनी मागितली मनसेकडून मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2021 6:27 PM

या मागणीसाठी नुकतीच येथील रहिवाशांनी मनसे चित्रपट कर्मचारी सेना अध्यक्ष अमेय खोपकर यांची भेट घेतली.

ठळक मुद्देआता मनसेचे प्रतिनिधी लवकरच संजय लीला भन्साळी यांची भेट घेऊन यात मध्यस्थी करणार आहेत.

हुसैन जैदीचे पुस्तक 'माफिया क्वीन्स ऑफ मुंबई'मध्ये गंगूबाईची कहाणी आहे आणि याच पुस्तकावर आधारित संजय लीला भन्साळी नवीन चित्रपटाची निर्मिती करत आहे. या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला. 'गंगूबाई काठियावाडी' सिनेमात डॉन गंगूबाईची कथा दाखवण्यात आली आहे आणि चित्रपटात आलिया भट डॉनच्या भूमिकेत आहे. 

हा चित्रपट काही ना काही कारणांनी वादात अडकेलला आहे. आता या चित्रपटासंदर्भात कामाठीपुरा भागात राहाणाऱ्या लोकांनी नुकतीच मनसेची मदत मागितली आहे. या चित्रपटात असलेला कामाठीपुऱ्याचा उल्लेख वगळावा, अशी मागणी स्थानिक रहिवाशांनी केली आहे. कामाठीपुऱ्यात राहत असल्याने सार्वजनिक जीवनात आधीच अडचणींना तोंड द्यावे लागते, त्यात या चित्रपटामुळे आमच्या अडचणी आणखी वाढू नयेत, असे रहिवाशांचे म्हणणे आहे.

या मागणीसाठी नुकतीच येथील रहिवाशांनी मनसे चित्रपट कर्मचारी सेना अध्यक्ष अमेय खोपकर यांची भेट घेतली. आता मनसेचे प्रतिनिधी लवकरच संजय लीला भन्साळी यांची भेट घेऊन यात मध्यस्थी करणार आहेत. 

काहीच दिवसांपूर्वी गंगूबाई काठियावाडी या चित्रपटात अजय देवगणची एंट्री झाली आहे. अजयने या चित्रपटाच्या चित्रीकरणाला नुकतीच सुरुवात केली आहे. अजय या चित्रपटात छोट्याशा पण अतिशय महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

टॅग्स :आलिया भट