Join us  

जिया खानची आई राबिया खान यांनी पुन्हा लिहिले पंतप्रधानांना पत्र; न्यायाची केली याचना!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2017 2:56 PM

दिवंगत अभिनेत्री जिया खान हिची आई राबिया खान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहून न्यायासाठी याचना केली ...

दिवंगत अभिनेत्री जिया खान हिची आई राबिया खान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहून न्यायासाठी याचना केली आहे. जियाची आई राबिया यांचा आरोप आहे की, या हत्येप्रकरणाला पोलिसांनी आत्महत्या म्हणून दाखविले आहे. त्यांनी दावा केला की, ३ जून २०१३ रोजी जियाची फ्लॅटमध्ये हत्या करण्यात आली होती. मात्र जियाने आत्महत्या केली की, हत्याबाबतचा अद्यापपर्यंत कुठलाही उलगडा झाला नाही. राबिया यांनी याअगोदरही पंतप्रधानांना पत्र लिहून मुलीच्या मृत्यूची चौकशी करण्याची मागणी केली होती. आता पुन्हा एकदा त्यांनी पंतप्रधानांना पत्र लिहून याप्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे. पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात राबियाने म्हटले की, ‘पोलिसांनी अतिशय नियोजनबद्धपणे हत्येला आत्महत्येत रूपांतरित केले आहे. मी २०१३ मध्ये मुंबई उच्च न्यायालयात फॉरेंसिंग एविडेंससह याचिका दाखल केली आहे. या एविडेंसमध्ये ब्रिटिश फॉरेंसिक एक्सपर्टने स्पष्ट शब्दात लिहिले आहे की, जियाच्या शरीरावर असलेल्या जखमांमुळे ही आत्महत्या नसून हत्या आहे. काही दिवसांपूर्वीच राबियाने मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयावर आव्हान देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात विशेष अवकाश याचिका दाखल केली आहे. मात्र न्यायालयाने त्यांची ही याचिका रद्दबातल ठरविली आहे. तसेच त्यांना खालच्या न्यायालयात याचिका दाखल करण्यास सांगितले आहे. या अगोदर २०१६ मध्ये उच्च न्यायालयाने त्यांची स्पेशल एसआयटी गठीत करण्याची मागणी  फेटाळून लावली होती. भारतीय फॉरेंसिक तज्ज्ञांच्या चौकशीत ही बाब समोर आली होती की, जिया खानच्या ओठांवर असलेल्या जखमा आत्महत्येदरम्यान ओठ ताणल्यामुळे झाल्या असाव्यात. मात्र जेम्स के यांनी हा मुद्दा खोडून काढताना अशाप्रकारच्या जखमा आत्महत्या करताना होऊच शकत नसल्याचे म्हटले होते. ऐवढेच नव्हे तर भारतीय तज्ज्ञांनी जियाच्या हनवटीखाली झालेली जखम ही कपडा बांधताना झाली असावी हा मुद्दाही जेम्स यांनी खोडून काढला होता. त्यांच्या मते अशाप्रकारची जखम होणे अशक्य आहे. जेम्स यांनी म्हटले होते की, फोटोमध्ये हनवटीखाली अंड्याच्या आकाराची निशाणी दिसत आहे. अशाप्रकारची निशाणी एखाद्या भारी वस्तू मारल्यानंतरच होऊ शकते. जेम्सच्या मते, ‘जियाच्या फोटोमध्ये दिसत असलेल्या जखमा बघून हा आत्महत्येचा प्रकार असू शकत नाही. पहिल्या नजरेतच हा सर्व आत्महत्येचा बनाव रचल्याचे दिसून येते.’ दरम्यान, आता पुन्हा एकदा जियाच्या आईने पंतप्रधानांना पत्र लिहिल्याने हे प्रकरण पुन्हा एकदा नव्याने सुरू होण्याची शक्यता आहे.