राज्यसभा सदस्य म्हणून सभागृहात आपले अंतिम भाषण करणारे जावेद अख्तर ‘भारतमाता की जय’ या नाऱ्यावर जे बोलले, त्यामुळे ते देशभर चर्चेत आले आहेत. आपल्या भाषणाने वाहवा मिळविण्याचा हा त्यांचा पहिलाच क्षण नव्हता. बॉलीवूडमध्ये जावेद अख्तर नेहमी आपल्या चांगल्या वागणुकीमुळे चर्चेत असतात, त्याचवेळी एखादी गोष्ट करण्याचा निश्चय केल्यानंतर, ते कोणाचेही ऐकत नाहीत आणि आपल्या भूमिकेवर कायम राहतात.प्रकाश मेहरा यांच्या जंजीर चित्रपटात सलीम-जावेद यांची जोडी लेखक म्हणून पुढे आली. परंपरा असल्याचे सांगत प्रकाश मेहरा यांनी जंजीरच्या पोस्टरवर या दोघांची नावे टाकण्यास नकार दिला होता. त्यानंतर जावेद यांनी सलीम खान यांच्यासोबत मुंबईत या चित्रपटाच्या पोस्टरखाली आपले नाव रंगाने टाकले.यश चोप्रा जेव्हा काला पत्थर चित्रपट तयार करत होते, त्या वेळी या चित्रपटाचे लेखनही सलीम-जावेद ही जोडी करीत होती. यश चोप्रा यांनी काही कारणास्तव शत्रुघ्न सिन्हा यांना हटवून फिरोज खान यांना आणण्याचा निर्णय घेतला होता. त्या वेळी पुढे येत जावेद अख्तर यांनी याला विरोध केला आणि शत्रुघ्न सिन्हा यांना न हटविण्याची भूमिका घेतली. असे झाल्यास आपली कथा मागे घेण्याचा त्यांनी निर्णय घेतला होता. यश चोप्रा यांना जावेद अख्तर यांच्यासमोर झुकावे लागले.यशाच्या शिखरावर पोहोचल्यानंतर सलीम आणि जावेद हे वेगळे झाले. त्यानंतर आपल्या भूमिकेशी कायम राहत त्यांनी पुन्हा सलीम खान यांच्यासमवेत काम करण्यास नकार दिला. जंजीर चित्रपटाच्या रॉयल्टीबाबत ते सलीम खान यांच्यासमवेत आले होते, ही गोष्ट वेगळी.करण जोहर यांचा चित्रपट ‘कुछ कुछ होता है’ या चित्रपटाचे नाव अश्लील वाटल्याच्या कारणास्तव जावेद अख्तर यांनी गाणी लिहिण्यास नकार दिला होता. त्यानंतर त्यांनी आपला निर्णय चुकीचा असल्याचे सांगितले. संगीतकार अनू मलिक यांनी एकदा जावेद अख्तर यांच्या गीतामधील शब्द बदलण्याचा निर्णय घेतल्यानंतर जावेद यांनी त्यांना झापले आणि आपले गाणे परत घेतले.
- anuj.alankar@lokmat.com