Join us  

इरफान खानची आणि त्याच्या पत्नीची अशी सुरू झाली होती लव्हस्टोरी, त्याच्या निधनाने खचले आहे कुटुंब

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2020 4:51 PM

इरफानचे त्याच्या पत्नीवर प्रचंड प्रेम होते. मला माझ्या पत्नीसाठी जगायचे आहे असे त्याने काही महिन्यांपूर्वी दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते.

ठळक मुद्देइरफानने १९९४ मध्ये त्याच्या अभिनयप्रवासाला सुरुवात केल्यानंतर त्या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी १९९५ मध्ये कोर्टात लग्न केले.

आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या इरफान खानचे नुकतेच निधन झाले. त्याच्या निधनाने सगळ्यांनाच धक्का बसला आहे. इरफानला केवळ भारतातच नव्हे तर जगभर फॅन फॉलोव्हिंग होते. इरफानचे निधन मुंबईतील कोकीळाबेन रुग्णालयात झाले. 

इरफानच्या पश्चात त्याची पत्नी आणि दोन मुलं आहेत. इरफान आणि त्याची पत्नी सुतापा यांनी अनेक वर्षांच्या नात्यानंतर लग्न केले होते. इरफान लहान असताना त्याला अभिनयात नव्हे तर खेळात रस होता. त्यामुळे तो घरच्या व्यवसायाकडे लक्ष देत नव्हता. पण खेळात करियर केल्यास घरातील लोक पाठिंबा देणार नाहीत याची त्याला कल्पना होती. तो जयपूरमध्ये एमए करत असताना त्याला अचानक दिल्लीतील प्रसिद्ध नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाची स्कॉलरशिप मिळाली आणि त्याच्या आयुष्याला एक कलाटणी मिळाली. तिथेच त्याची आणि सुतापाची पहिली भेट झाली. सुतापाला अभिनयात नव्हे तर लेखनात रस होता. काहीच भेटींमध्ये इरफान आणि सुतापा एकमेकांचे खूप चांगले फ्रेंड्स बनले आणि या मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाले. 

इरफानने १९९४ मध्ये त्याच्या अभिनयप्रवासाला सुरुवात केल्यानंतर त्या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी १९९५ मध्ये कोर्टात लग्न केले. सुतापाने इरफानच्या करियरच्या सुरुवातीला त्याच्यासोबत एक टेलिफिल्म बनवली होती... हीच टेलिफिल्म पाहून त्याला गोविंद निहलानी यांनी अभिनयक्षेत्रात संधी दिली. इरफान आणि सुतापाने करियरच्या सुरुवातीला अनेकवेळा एकत्र काम केले. बनेगी अपनी बात या मालिकेची लेखिका सुतापा होती तर या मालिकेत इरफानने महत्त्वाची भूमिका साकारली होती.

इरफान आणि सुतापा यांना बाबील आणि अयान अशी दोन मुलं आहेत. बाबील परदेशात शिकत असून कोरोना व्हायरसने जगभर घातलेल्या थैमानानंतर तो काहीच दिवसांपूर्वी भारतात त्याच्या घरी परतला आहे. 

 

टॅग्स :इरफान खान