Join us  

अपार संघर्षानंतर इरफानला बॉलिवूडमध्ये मिळाले होते यश, वाचा त्याचा संपूर्ण प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2020 2:44 PM

त्याच्या वडिलांचा टायरचा बिझनेस होता.

अष्टपैलू अभिनेता इरफान खान याची एक्झिट बॉलिवूडसह सगळ्यांनाच मनाला चटका लावून गेली. त्याच्या निधनाने सगळ्यांनाच धक्का बसला आहे. 'पान सिंग तोमर'साठी इरफान नॅशनल अॅवॉर्डने सन्मानित करण्यात आले आहे. इरफानने 1995 मध्ये सुतपा सिकंदरसोबत लग्न केले. इरफान आणि सुतपाला बबिल आणि आयन अशी दोन मुले आहेत.

इरफान खानचा जन्म जयपूरमध्ये झाला होता. त्याच्या वडिलांचा टायरचा बिझनेस होता. बॉलिवूडमधील प्रवासात इरफानला अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. मात्र तो कधीच हिम्मत हरला नाही. 'सलाम बॉम्बे'मध्ये त्याला छोटीशी भूमिका साकारायला मिळाली होती. यानंतर त्याने कधीच मागे वळून पाहिले नाही. पिकू, पान सिंग तोमर, द लंचबॉक्स, हिंदी मीडियम, मुंबई मेरी जान यांसारख्या बॉलिवूडच्या चित्रपटात एकापेक्षा एक दर्जेदार भूमिका साकारल्या होत्या.      

 एकेकाळी त्याच्याकडे ‘ज्युरासिक पार्क’ हा चित्रपट पाहण्यासाठीदेखील खिशात पैसे नव्हते आणि आज त्याने न केवळ त्या सिनेमात स्वत: काम केले तर अनेक हॉलीवूड सिनेमांत (द नेमसेक, लाईफ ऑफ पाय, अमेझिंग स्पायडरमॅन, स्लमडॉग मिलेनेयर) तो झळकला आहे. 

इरफानने त्याच्या कारकिर्दीची सुरुवात छोट्या पडद्यापासून केली. त्याने त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला चाणक्य, भारत एक खोज, बनेगी अपनी बात, चंद्रकांता यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले होते. त्याने त्यानंतर एक डॉक्टर की मौत, सच अ लाँग जर्नी यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले. पण त्याला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मकबूलमधील भूमिकेमुळे मिळाली. 

2011 साली इरफानला पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले होते. गेल्या दोन वर्षांपासून तो कन्सरशी झुंज देत होता. न्यूरो एंडोक्राइन ट्युमरवरील उपचारासाठी न्यूयॉर्कला गेला होता. आज या अभिनेत्याने जगातून कायमची एक्झिट घेतली. 

टॅग्स :इरफान खान