Join us  

व्यक्तिरेखेतील आव्हान मी स्विकारले-अनुष्का शर्मा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2018 6:35 PM

अभिनेता वरूण धवन आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा हे आगामी चित्रपट ‘सुई धागा-मेड इन इंडिया’ या चित्रपटातून एकत्र दिसणार आहेत. ही आगळीवेगळी जोडी प्रथमच प्रेक्षकांच्या समोर येत आहे.

शमा भगत

अभिनेता वरूण धवन आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा हे आगामी चित्रपट ‘सुई धागा-मेड इन इंडिया’ या चित्रपटातून एकत्र दिसणार आहेत. ही आगळीवेगळी जोडी प्रथमच प्रेक्षकांच्या समोर येत आहे. भोपाळ, दिल्ली याठिकाणी चित्रपटाचे शूटिंग झाले असून या चित्रपटासाठी वरूण आणि अनुष्का हे विशेष उत्सुक आहेत. या चित्रपटाविषयी आणि आत्तापर्यंतच्या कारकिर्दीविषयी अनुष्का शर्मा हिच्याशी साधलेला हा संवाद...

* दिग्दर्शक शरत कटारिया यांना चित्रपटासाठी होकार कसा दिलास?- मी शरत कटारिया यांनी दिग्दर्शित केलेले अनेक चित्रपट आत्तापर्यंत पाहिले आहेत. एक दिग्दर्शक म्हणून चित्रपट, कथानक  या त्यांच्या कामाचा मला आदर वाटतो. खऱ्या कथा प्रेक्षकांसमोर आणण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. 

* ‘सुई-धागा’साठी तुम्ही एखाद्या वर्कशॉपला गेला आहात का?- वरूण, मी आणि शरत आम्ही अतुल मोंगिया यांच्या अंतर्गत एक वर्कशॉपमध्ये गेलो आहोत. त्यात खरंच खूप चांगला अनुभव आला. आम्ही भूमिके सोबत कम्फर्टेबल झालो. आम्ही भूमिका आणि सीन्स यांची एकमेकांसोबत चर्चा करायचो. मला हा वर्कशॉपचा प्रकार खूपच आवडला. कारण यात आम्ही दिग्दर्शक, निर्माता मिळून सगळे स्क्रिप्टबद्दल चर्चा करत असू. वर्कशॉपमध्ये जेव्हा आम्ही वेळ दे असू तेव्हा चित्रपटाचे वेगवेगळे आयाम समजत असत. आम्ही सेटवर खूप वेळ घालवत असू. तेथील स्थानिक लोकांसोबत मी संवाद साधायचे ज्यामुळे मला ममताची भूमिका समजायला सोप्पं गेलं. 

* वरूण म्हणाला की तो उत्स्फूर्त आहे. पण, तुला वाटायचं की, त्याने स्क्रिप्टला धरूनच संवाद म्हणावेत?- मला त्याच्यातील उत्स्फूर्तपणा मनापासून आवडतो. पण, मी त्याला नेहमी सांगते की, तू चित्रपटाच्या स्क्रिप्टचेच संवाद बोलत जा म्हणून. पण, तो कधीकधी उत्साहात त्याचे संवाद बदलतो. त्यामुळे ते संवाद भूमिकेच्या जवळ जात नाहीत. 

* ममताच्या भूमिकेसाठी तूला काय तयारी करावी लागली? - ममताची भूमिका ही खरंतर खूप कठीण आहे. हेच आव्हान म्हणून मी स्विकारले. तुम्हाला एक कलाकार म्हणून आव्हान वाटतील अशाच भूमिका खरंतर तुम्ही केल्या पाहिजेत. मी स्वत:ला मानसिक पातळीवर ममता बनायला तयार केले. त्यामुळे पुढचे सगळेच सोपे झाले.

* तुझ्या भूमिकेबद्दलचे बरेच मेमेज अशातच सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यामुळे तू नाराज झालीस का?- ते खूपच गमतीशीर होते. मी ते मेमेज खूप एन्जॉय केले. तसेच वैयक्तिक पातळीवर मी शरत आणि वरूण यांच्यासोबत शेअर देखील केले. मला छान वाटलं की, ती भूमिका प्रेक्षकांपर्यंत पोहोचली आहे. प्रेक्षक त्यांच्यासोबत स्वत:हून कनेक्ट होऊ इच्छितात.

* भूमिकेसाठी तू काय काय शिकलीस?- एम्ब्रॉयडरी, ब्लॉक प्रिंटींग करणं आणि डोक्यावर पदर धरून ठेवणे. मला ममतासारखे दिसणे अपेक्षित होते, त्यामुळे मी हे शिकले आहे. तिला दररोज कसे वाटते आणि कुटुंबात तिचा वावर कसा आहे? याविषयी मी जाणून घेतले.

 * चित्रपटाची कथा पती-पत्नीच्या नात्यांवर प्रकाश टाकणारी आहे. त्यामुळे तुला नातेसंबंध समजायला सोप्पं गेलं का?- पती-पत्नी संबंध याशिवायही या चित्रपटात बरंच काही आहे. कुटुंब, आचार-विचारांची देवाण-घेवाण आणि मानवी संघर्ष हे प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा यात प्रयत्न केला गेला आहे. 

* चंदेरीमधील हातमाग कामगारांना तू भेटली आहेस का?- आम्ही चंदेरीतच शूटिंग केले आणि कला-हातमाग यांचे संवर्धन होताना पाहिले. एम्ब्रॉयडरी करण्याचं काम मी शिकले. 

टॅग्स :अनुष्का शर्मासुई-धागा