Join us

हेमा मालिनी यांनी म्हटले, ‘अपघात झाला तेव्हा सनी देओलनेच माझी काळजी घेतली’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2017 15:18 IST

ड्रिमगर्ल हेमा मालिनी यांच्या जीवनावर आधारित ‘बीयॉन्ड द ड्रीम्स’ या पुस्तकाचे कालच अनावरण करण्यात आले. हे पुस्तक रामकमल जीवन ...

ड्रिमगर्ल हेमा मालिनी यांच्या जीवनावर आधारित ‘बीयॉन्ड द ड्रीम्स’ या पुस्तकाचे कालच अनावरण करण्यात आले. हे पुस्तक रामकमल जीवन यांनी लिहिले आहे. पुस्तकाचे प्रकाशन अभिनेत्री दीपिका पादुकोण हिच्या हस्ते करण्यात आले. या पुस्तकाचे पहिले पान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिहिले असल्याने त्यास विविध अंगांनी अर्थ प्राप्त झाला आहे. असो, हेमा मालिनींच्या या पुस्तकाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यामध्ये अनेक खुलासे अतिशय बिंधास्तपणे करण्यात आले आहेत. फिल्मी आयुष्य असो वा कौटुंबिक जीवन याबद्दल अतिशय मोकळेपणाने पुस्तकात भाष्य करण्यात आले आहे. त्याची झलक प्रकाशन सोहळ्यादरम्यान बघावयासही मिळाली. कारण या सोहळ्यात हेमा आणि दीपिका यांनी अतिशय मोकळेपणाने काही गोष्टींचे खुलासे केले आहेत. हेमा मालिनी यांनी त्यांची सावत्र मुले सनी आणि बॉबी देओल यांच्याविषयीदेखील भाष्य केले. हेमा यांनी म्हटले की, ‘सनी आणि बॉबीबरोबर माझे नाते खूप चांगले आहे. जेव्हा माझा अपघात झाला होता तेव्हा सर्वात अगोदर सनी मला बघायला आला होता. एवढेच नव्हे तर त्यावेळी सनीने माझी खूप काळजीही घेतली होती. यावेळी हेमा यांनी त्यांच्या संघर्ष काळातील दिवसांच्या आठवणींनाही उजाळा दिला. त्यांनी म्हटले की, एक काळ असा होता की मला फिल्मी दुनियेतून अक्षरश: रिजेक्ट करण्यात आले होते. बॉलिवूडच नव्हे तर साउथ इंडस्ट्रीमध्येदेखील मला एंट्री मिळाली नव्हती. यावेळी हेमा यांनी दीपिका पादुकोणचेही भरभरून कौतुक केले. दीपिका आजच्या युगातील ड्रिमगर्ल असल्याचेही त्यांनी म्हटले. याचा अर्थ मी आउट झाले असा होत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मुलगी ईशाच्या आग्रहास्तव हेमाने तोदेखील किस्सा सांगितला, ज्यामध्ये त्यांच्या लग्नासाठी चक्क जाहिरात देण्यात आली होती. हेमा मालिनी यांनी ड्रिमगर्लचा किताब दिल्यानंतर दीपिकानेही तिच्या आयुष्यातील एका रहस्याचा उलगडा केला. ते रहस्य दुसरे-तिसरे काहीही नसून, तिचे शिक्षण आहे. होय, दीपिकाने सांगितले की, ती केवळ बारावी उत्तीर्ण आहे. वास्तविक माझ्या आई-वडिलांना वाटायचे की, मी शिक्षण पूर्ण करावे. परंतु माझ्या डोक्यात वेगळेच विचार सुरू असल्याने मी केवळ बारावीपर्यंतचेच शिक्षण पूर्ण केल्याचे दीपिकाने सांगिंतले. यावेळी महानायक अमिताभ बच्चन, शाहरूख खान यांच्यासह अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते.