Join us  

​ अलविदा शशी कपूर! गहिवरले बॉलिवूड, ढगांनीही ढाळले अश्रू...!!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 05, 2017 7:26 AM

४ डिसेंबर २०१७ हा दिवस ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांच्या आयुष्याचा अंतिम दिन ठरला. याच दिवशी मुंबईच्या एका रूग्णालयात ...

४ डिसेंबर २०१७ हा दिवस ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांच्या आयुष्याचा अंतिम दिन ठरला. याच दिवशी मुंबईच्या एका रूग्णालयात शशी कपूर यांनी अंतिम श्वास घेतला. त्यांच्या निधनाने अख्खे बॉलिवूड शोकाकूल झाले आहे. शशी कपूर यांचे पार्थिव रूग्णालयातून थेट त्यांच्या घरी ‘जानकी कुटी’ येथे नेण्यात आले. याठिकाणी काही वेळ त्यांचे पार्थिव अंत्य दर्शनासाठी ठेवण्यात आले. यानंतर सांताक्रूज हिंदू स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.  शशी कपूर यांना २०११ मध्ये पद्मविभूषण पुरस्कार मिळाला होता. पद्मविभूषणने गौरविण्यात आलेल्या व्यक्तींवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येतात. शशी कपूर यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी तीन राऊंड फायरिंग करण्यात आले. पोलिसांची एक तुकडी यावेळी येथे उपस्थित होती.  बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी शशी कपूर यांच्या अंत्यविधीसाठी स्मशानभूमीत पोहोचले. ऋषी कपूर, नीतू कपूर, रणबीर कपूर, करीना कपूर, करिनाचा पती सैफ अली खान, करिश्मा कपूर कपूर या सगळ्या कपूर कुटुंबीयांसह अमिताभ बच्चन, शाहरुख खान, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय, श्वेता नंदा, काजोल,  बोनी कपूर, राणी मुखर्जी,  नशीरूद्दीन शहा, शक्ती कपूर यांच्यासह अनेक कलाकार यावेळी स्मनाशभूमीत उपस्थित होते. शशी कपूर यांची मुले संजना कपूर आणि करण कपूर यूएसला होती. आज सकाळी ती मुंबईत दाखल झाली. गेल्या २४ तासांपासून मुंबईत पाऊस होत आहे. शशी कपूरच्या चाहत्यांनी यावरून ‘आकाशही धाय मोकलून रडतेयं...’, अशा शब्दांत सोशल मीडियावर भावूक संदेश लिहिले आहेत. ALSO READ : जाणून घ्या, शशी कपूर यांची तिन्ही मुले सध्या काय करतात?१९८४ मध्ये शशी कपूर यांच्या पत्नी जेनिफर यांचे कर्करोगाने निधन झाले होते. जेनिफर यांच्या निधनानंतर शशी कपूर एकाकी राहायला लागले होते. यानंतर ते सतत आजारी राहू लागले. आजारपणामुळे त्यांनी चित्रपटांपासून संन्यास घेतला. २०११ मध्ये त्यांना भारत सरकारने पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले होते. २०१५ मध्ये दादा साहेब फाळके पुरस्कारानेही त्यांना गौरविले गेले. कपूर घराण्यातील हा पुरस्कार मिळवणारे ते तिसरे सदस्य होते. शशी कपूर यांनी सुमारे १६० चित्रपटांत काम केले. यात १४८ हिंदी व १२ इंग्रजी चित्रपटांचा समावेश आहे. १८ मार्च १९३८ रोजी जन्मलेल्या शशी कपूर यांनी ६० व ७० च्या दशकांत एकापेक्षा एक हिट चित्रपट दिलेत. अवघे कपूर घराणे त्यांना ‘अंग्रेज कपूर’ नावाने बोलवायचे. कारण शशी कमालीचे शिस्तप्रीय होते. ते दिवसभरात १५ ते १८ तास शूटिंग करायचे. यामुळेच राज कपूर यांनी त्यांना ‘टॅक्सी कपूर’ हे नाव दिले होते.