Join us  

या दिवशी होणार 'जीनियस' चित्रपटाचा ट्रेलर लाँच

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2018 3:22 PM

'गदर' चित्रपटाचे दिग्दर्शक अनिल शर्मा हे मुलगा उत्कर्षला 'जीनियस' चित्रपटातून लाँच करणार आहेत.

ठळक मुद्दे 'जीनियस' या चित्रपटात झळकणार मिथुन चक्रवर्ती आणि आयशा जुल्काही जीनियस' चित्रपट येणार २४ ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला

 'गदर: एक प्रेम कथा' या चित्रपटातून अभिनेता सनी देओलचा मुलगा 'जीते'च्या भूमिकेतून अभिनेता उत्कर्ष शर्माने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले होते. आता बऱ्याच वर्षांनंतर तो बॉलिवूडमध्ये कमबॅक करण्यासाठी सज्ज झाला आहे. 'गदर' चित्रपटाचे दिग्दर्शक अनिल शर्मा हे मुलगा उत्कर्षला 'जीनियस' चित्रपटातून लाँच करणार आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर २४ जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे.

उत्कर्षने मुंबईत शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर कॅलिफोर्नियात सिनेमाचे शिक्षण घेतले. त्यानंतर न्यूयॉर्कमधील ली स्टार्सबर्ग थिएटर अॅण्ड फिल्म इन्स्टिट्युटमधून पदवी घेतली व मग, त्याने बॉलिवूडमध्ये एन्ट्री करायचे ठरविले. काही दिवसांपूर्वीच 'जीनियस' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला होता. या टीझरला प्रेक्षकांनी पसंती दर्शवली आहे.या चित्रपटाच्या टीझरमध्ये उत्कर्षसोबत नवाजुद्दीन सिद्दीकीदेखील दिसला होता. नवाजुद्दीन यात निगेटीव्ह भूमिकेत दिसणार आहे. 'जीनियस' चित्रपटातून इशिता चौहान ही अभिनेत्री बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या चित्रपटाबाबत दिग्दर्शक अनिल शर्मा खूप उत्सुक आहेत. आता या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होणार असून या ट्रेलरला प्रेक्षकांचा प्रतिसाद कसा मिळतो, हे पाहण्यासाठी अनिल शर्मा व उत्कर्ष खूप उत्सुक आहेत. त्यांना आशा आहे की टीझरप्रमाणे ट्रेलरलाही प्रेक्षकांची पसंती नक्कीच मिळेल.  'जीनियस' या चित्रपटात मिथुन चक्रवर्ती आणि आयशा जुल्काही झळकणार आहे. या चित्रपटातील पहिले गाणे 'तेरा फितूर' प्रदर्शित झाले आहे, अरजीत सिंगने या गाण्याला स्वरसाज दिला आहे. या गाण्याला प्रेक्षकांची पसंती मिळते आहे.या चित्रपटात अॅक्शन आणि प्रेमकथा पाहायला मिळणार आहे. 'जीनियस' हा चित्रपट २४ ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येईल. इतक्या वर्षांच्या कालावधीनंतर उत्कर्ष शर्माला रुपेरी पडद्यावर अभिनय करताना पाहणे कमालीचे ठरणार आहे.