Join us  

‘अभिनयाने माझ्या आयुष्यात भरले रंग’-अनुप्रिया गोएंका

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2018 12:09 PM

अबोली कुलकर्णी अभिनेत्री अनुप्रिया गोएंका हिने  ‘बॉबी जासूस’, ‘माया’,‘ढिशूम’ अशा अनेक हिंदी, तेलुगू चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. ...

अबोली कुलकर्णी अभिनेत्री अनुप्रिया गोएंका हिने  ‘बॉबी जासूस’, ‘माया’,‘ढिशूम’ अशा अनेक हिंदी, तेलुगू चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. त्यासोबतच ‘टायगर जिंदा हैं’ या चित्रपटांत पूर्ना या तिच्या नर्सच्या भूमिकेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. चाहत्यांसोबतच समिक्षकांनीही तिच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. तिच्याशी आत्तापर्यंतच्या कारकिर्दीविषयी मारलेल्या गप्पा...* अनुप्रिया, तुझ्या करिअरच्या प्रवासाविषयी काय सांगशील?-  मी ६-७ वर्षांची असतानाच आम्ही दिल्लीत शिफ्ट झालो होतो. माझं शालेय शिक्षण दिल्लीत झालं. थोडी मोठी झाल्यावर मी वडिलांच्या बिझनेसमध्ये लक्ष देऊ लागले. मात्र, काही व्यावसायिक कारणांमुळे आम्हाला त्यातून बाहेर पडावे लागले. त्यानंतर मी नोकरी करत असताना ३-४ महिने थिएटर करण्याचा निर्णय घेतला. पण, थिएटरमधून पैसा मिळत नाही, त्यामुळे मी अभिनयक्षेत्रात संधी शोधू लागले. संधी मिळत गेल्या आणि मग मलाही अभिनयाची रूची लागली. मॉडेलिंग, जाहिरातींचे शूटिंग यांच्या आॅफर्स मिळू लागल्याने मला कामाचं समाधान मिळू लागलं. * ‘टायगर जिंदा हैं’ मधून तुला मोठा ब्रेक मिळाला. पूर्ना या भूमिकेचे प्रचंड कौतुक झाले. भाईजानसोबत काम करण्याचा अनुभव कसा होता?- खूप खूप धन्यवाद. पूर्नाची भूमिका माझ्या अनेक चाहत्यांना आवडली. चित्रपटात मला बॉलिवूडचा दबंग स्टार सलमान खान सोबत काम करण्याची संधी मिळाली, हे माझं भाग्यच. मला त्यांच्याकडून बरंच काही शिकायला मिळालं. सगळयांत महत्त्वाचं ते एक उत्तम व्यक्ती आहेत. न्यूकमर्सला ते समजून घेतात आणि प्रोत्साहन देतात. त्यांच्याकडून शिकण्यासारखं बरंच काही आहे. * अभिनयाच्या क्षेत्रातील तुझे प्रेरणास्थान कोण आहे?- अभिनयाच्या क्षेत्रात मला कलाकार म्हणून खूप काही शिकायला मिळालं. मी थिएटर करत असतानापासूनच मी माझे आदर्श ठरवायला सुरूवात के ली होती. जुन्या काळातील मधुबाला, स्मिता पाटील, रेखा, शबाना आझमी तसेच आताच्या आलिया भट्ट, विद्या बालन, दीपिका पादुकोण या माझ्यासाठी अभिनयातील प्रेरणास्थान आहेत. त्याचबरोबर हॉलिवूडच्या अनेक अभिनेत्री माझ्यासाठी आदरस्थानी आहेत. * कोणत्या प्रकारच्या व्यक्तिरेखांमध्ये तू स्वत:ला कम्फर्टेबल मानतेस?- खरंतर अभिनय अशी कला आहे की, ज्यामुळे तुम्ही एका आयुष्यात अनेकांचे आयुष्य जगू शकता. आयुष्याचा संपूर्ण आनंद लुटू शकता. आणि शेवटी आयुष्य हे आव्हानात्मक असेल तरच ते जगण्यात काही अर्थ आहे. त्यामुळे मला नेहमी चॅलेंजिंग रोल करायला प्रचंड आवडतं. त्याचबरोबर चांगले दिग्दर्शक, निर्माता यांची साथ मिळणं हे देखील तितकंच महत्त्वाचं असतं. थोडक्यात सांगायचं तर, विविधांगी भूमिका करायला मला आवडते.* तेलुगू चित्रपट, वेबसीरिज, जाहिराती, मॉडेलिंग या सर्व प्रकारांत तू स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहेस. परंतु, कोणता प्रकार तुला जास्त आवडतो? - खरंतर, कलाकार म्हणून मी प्रत्येक प्रकारांत स्वत:ला अ‍ॅडजेस्ट करायला हवं, आणि ते मी करतेच. या सर्व प्रकारांचे आपआपल्या ठिकाणी एक चॅलेंज असते. ते कलाकार म्हणून आपल्याला निभावायलाच पाहिजे. त्यातच खरी मजा असते. त्यातल्या त्यात अर्थातच अभिनयात मी जास्त रमते. कारण त्यादरम्यान तुम्ही एका टीमसोबत काही काळ राहता. तुम्ही एकमेकांशी भावनात्मकरित्या एकमेकांमध्ये गुंतता. आयुष्यात तुम्ही काय कमावले आहे, हे या जमापुंजीतूनच कळते. * अभिनय तुझ्यासाठी एक कलाकार म्हणून किती महत्त्वाचा आहे?- खूप जास्त. अ‍ॅक्टिंग माझ्यासाठी पॅशन आहे. अभिनयाने माझे आयुष्य बदलले आहे. माझ्या आयुष्यात रंग भरण्याचे काम अभिनयाने केले आहे. या क्षेत्रात आल्यामुळे मला बरंच काही शिकायला देखील मिळाले आहे.