अशी स्मिता होणे नाही !
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2016 12:52 IST
भारतीय सिनेसृष्टीला पडलेलं तरल स्वप्न.. रुपेरी पडद्यावर भारतीय स्त्रीची पर्यायी प्रतिमा साकारणारी अभिनेत्री..त्यांनी रसिकांना हसवलं.. रडवलं.. इतकंच नाही तर ...
अशी स्मिता होणे नाही !
भारतीय सिनेसृष्टीला पडलेलं तरल स्वप्न.. रुपेरी पडद्यावर भारतीय स्त्रीची पर्यायी प्रतिमा साकारणारी अभिनेत्री..त्यांनी रसिकांना हसवलं.. रडवलं.. इतकंच नाही तर चिंतन करायलाही भाग पाडलं. मराठी भाषेचा उंबरठा ओलांडत ज्या अभिनेत्रीनं हिंदी रसिकांनाही वेड लावलं. १७ ऑक्टोबर १९५५ रोजी स्मिता पाटील यांचा जन्म पुण्यात झाला. एका सामाजिक आणि राजकीय पार्श्वभूमी असलेल्या घरात जन्माला आलेल्या स्मिता पाटील यांच्यावरही बालपणापासूनसमाजकारणाचे धडे कोरले गेले. त्यामुळंच की काय राष्ट्रीय सेवा दलाच्यासांस्कृतिक कार्यात त्या सक्रीय होत्या.अन्याय, अत्याचार याची स्मिता पाटील यांना चीड होती.त्याविरोधात आवाज उठवलाच पाहिजे असं त्यांचं स्पष्ट मत होतं. त्यामुळं शाळेत त्यांना टॉम ब्वॉय नावानंही संबोधलं जायचं. अन्यायाविरोधात असलेल्या याच रागामुळं बहुधा शिक्षणानंतर त्यांनी दूरदर्शनमध्ये वृत्तनिवेदिका म्हणून आपल्या करियरला सुरुवात केली. छोट्या पडद्यावरील स्मिता पाटील यांच्यातल्या वृत्तनिवेदिकेचे गुण हेरत असताना श्याम बेनेगल यांना अभिनेत्री स्मिता पाटीलचा शोध लागला. स्मिता पाटील यांच्यातली अभिनय क्षमता ओळखून श्याम बेनेगल यांनी 'चरणदास चोर' या सिनेमात पहिला ब्रेक दिला. पहिल्याच सिनेमातल्या स्मिता पाटील यांच्या अभिनयाचं सर्वच स्तरातून कौतुक झालं. याच सिनेमातल्या कसदार अभिनयामुळं त्यांना सर्वमान्यता मिळाली.त्यानंतर मात्र स्मिता पाटील यांनी मागे वळून पाहिलं नाही.तो काळ समांतर सिनेमांचा होता. १९७०-८० चं दशकात जणू काही अशा सिनेमांची लाटच आली होती. समाजातल्या गंभीर प्रश्न आणि अन्यायाला वाचा फोडणा-या विषयांवर सिनेमा बनू लागले. मूळात स्मिता एका सुशिक्षित आणि समाजवादी विचारसरणी असलेल्या कुटुंबातून आल्याने सामाजिक विषयांविषयी त्यांना विशेष कळवळा होता. त्यामुळे अशा सिनेमातल्या भूमिका वाट्याला येताच स्मिता पाटील यांनी जणू काही त्या रुपेरी पडद्यावर जिवंत केल्या. 'मंथन' आणि 'भूमिका' चित्रपटाल्या स्मिता पाटील यांच्या भूमिकाही विशेष गाजल्या.'मंथन' सिनेमामधून त्यांनी सहकारी चळवळीत सक्रिय झालेल्या हरिजन स्त्रीच्या व्यक्तिरेखेतलं सळसळते चैतन्य, आक्रमकता आणि सचोटी याचा सशक्त आविष्कार केला. तर हंसा वाडकर यांच्या आत्मकथेवर आधारित भूमिका या सिनेमातून पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये स्त्रीच्या मनातल्या भावनांना पडद्यावर जिवंत केलं.'उंबरठा' सिनेमात त्यांनी साकारलेली सुलभा महाजन ही व्यक्तीरेखा तर आपली आरशातली प्रतिमा आहे असं प्रत्येक स्त्रीला वाटत होतं. याशिवाय 'मिर्च मसाला'मधली सोनबाई असो किंवा मग अर्थमधली कविता सान्याल. दरवेळी स्मिता महिलांना आपलीशी वाटली.'जैत रे जैत' आणि 'सामना' सिनेमातल्या भूमिकांमधूनही त्यांनी आपल्या अभिनयाची वेगळी छाप पाडली.त्यांच्या 'शक्ती', 'नमक हलाल' या व्यावसायिक सिनेमांनासुद्धा सा-यांची दाद मिळाली. याशिवाय त्यांचे 'अर्धसत्य', 'अमृत', 'आक्रोश', 'आखिर क्यों', 'आनंद और आनंद', 'मंडी', 'निशांत' हे सिनेमाही गाजले. बी.आर.चोप्रा आणि श्याम बेनेगल, रमेश सिप्पी यादिग्दर्शकांच्या त्या आवडत्या अभिनेत्री होत्या. रुपेरी पडद्यावर अभिनयाची ताकद दाखवणा-या स्मिता पाटील यांच्यात कलाकार हेरण्याचीही ताकद होती. नाना पाटेकर आणि मोहन गोखले यासारख्या प्रसिद्ध अभिनेत्यांमधले गुणही स्मिता पाटील यांनीच हेरले. या सर्व गुणांसोबतच त्यांना सिक्स सेन्सची जबरदस्त दैवी देणगी लाभली होती.खुद्द महानायक बिग बी अमिताभ यांनी त्याचा उल्लेख केलाय. 'कुली' सिनेमात जखमी होण्याच्या आदल्या रात्री स्मिता पाटील यांनी रात्री उशिरा फोन करुन तब्येत ठिक आहे का नाही अशी आपुलकीने चौकशी केल्याचं खुद्द बिग बींनी सांगितलंय. अमूलसारख्या जाहिरातीमधला स्मिता पाटील यांचा चेहरा कोण बरं विसरेल.चित्रपटसृष्टीतल्या योगदानाबद्दल त्यांना दोन राष्ट्रीय आणि मानाच्या पद्मश्री पुरस्कारानंही गौरवण्यात आलं. एकीकडे चित्रपटसृष्टीत कारकीर्द बहरत असताना राज बब्बर यांच्याशी लग्न करुन त्यांनी संसार थाटला. मात्र नियतीच्या मनात काही औरच होतं. वयाच्या अवघ्या ३१ व्या वर्षी त्यांचा संसार आणि कारकीर्द प्रसुतीच्या वेळी झालेल्या निधनामुळे अधुरी राहिली. त्यांनी एका गोंडस बाळाला जन्म दिला.मात्र आपल्या आईचा चेहरा पाहण्याचा आणि तिच्यासह खेळण्याचं भाग्य त्या बाळाला लाभलं नाही. तो बाळ म्हणजेच अभिनेता प्रतीक बब्बर. अकाली निधनानंतरही स्मिता पाटील यांच्या नावाचा डंका जगभर वाजत होता.मॉस्को,न्यूयॉर्क आणि फ्रान्समधल्या विविध महोत्सवात त्यांच्या सिनेमाचं स्क्रीनिंग झालं.आंतरराष्ट्रीय स्तरावर रसिक आणि समीक्षकांकडून दाद मिळवणा-या त्या पहिल्या अभिनेत्री ठरल्या.समकालीन अभिनेत्री असो किंवा आजच्या जमान्यातल्या मॉडर्न नायिका प्रत्येकीला स्मिता पाटील यांनी अजरामर केलेली व्यक्तीरेखा साकारण्याची इच्छा आहे. विलक्षण अभिनय,बोलके डोळे, हुशार आणि सामाजिक बांधिलकीचं भान आज प्रत्येक स्त्री जपण्याचा प्रयत्न करतेय. मात्र अशी स्मिता पाटील पुन्हा होणे शक्य नाही.