Join us

फोटोतील या चिमुरडीला ओळखलंत का? लग्न न करताच शेवटपर्यंत विधवा बनून राहिली मराठमोळी अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2023 6:00 AM

फोटोत लता मंगेशकर यांच्यासोबत दिसणाऱ्या या चिमुरडीला ओळखलंत का?

फोटोत लता मंगेशकर यांच्यासोबत दिसणाऱ्या या चिमुरडीला ओळखलंत का? हा फोटो आहे मंदिर चित्रपटातील. ही चिमुरडी म्हणजे अभिनेत्री बेबी नंदा. बेबी नंदा ही मास्टर विनायकांची मुलगी. मंदिर चित्रपटात नंदाने मुलाची भूमिका साकारली होती. या चित्रपटातील भूमिकेसाठी नंदाला केस कापावे लागणार होते. त्याला तिचा विरोध होता. आपल्याला चित्रपटात काम करायचे नाही हे तिने ठरवले होते. दुर्दैवाने मास्टर विनायक यांचे चित्रपटावेळीच निधन झाले. पुढे दिनकर पाटील यांनी हा चित्रपट पूर्ण केला. वडिलांच्या निधनामुळे चित्रपटात काम करण्याशिवाय बेबी नंदाकडे कुठलाच पर्याय नव्हता. काही चित्रपटासाठी बालकलाकार म्हणून काम करत राहिल्या. 

मराठी चित्रपटातून नंदा यांनी नायिकेच्या भूमिका साकारल्या होत्या. देवघर, झालं गेलं विसरून जा, देव जागा आहे हे त्यांनी नायिका म्हणून मराठी चित्रपट केले होते. ६० ते ७० च्या दशकात नंदा यांनी अभिनेत्री म्हणून हिंदी सिनेइंडस्ट्रीत चांगले नाव मिळवले होते. सर्वाधिक मानधन घेणाऱ्या नायिकांमध्ये त्यांचे नाव गणले जात होते. मधल्या काळात मात्र त्यांना नायकाच्या बहिणीच्या भूमिका जास्त मिळू लागल्या होत्या. जब जब फुल खिले या चित्रपटावेळी त्यांना सैन्यातील एका मराठी कर्नलने लग्नाची मागणी घातली होती. पण हे प्रकरण पुढे गेलेच नाही. पूढे चित्रपट निर्देशक मनमोहन देसाई यांच्याशी सूर जुळून आले.

मास्टर विनायक यांचे मावसभाऊ व्ही शांताराम यांनी १९५६ साली तुफान और दिया चित्रपटातून नंदाला नायिकेची संधी देऊ केली. जब जब फुल खिले, गुमनाम, तीन देवियां, हम दोनों, इत्तेफाक अशा चित्रपटातून बेबी नंदा प्रमुख भूमिकेत झळकल्या. दरम्यान मनमोहन देसाई यांनी जीवनप्रभा यांच्याशी लग्न केले. जीवनप्रभा यांच्या निधनानंतर मनमोहन देसाई आणि नंदा यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. मात्र मनमोहन देसाई यांचे घराच्या बाल्कनीतून पडून अपघाती निधन झाले. यामुळे नंदा खूपच खचून गेल्या.  मनमोहन देसाई यांच्या पश्चात त्या पांढरे कपडे घालू लागल्या. लग्न न करताच मनमोहन देसाई यांच्या विधवा म्हणून वावरू लागल्या. २५ मार्च २०१४ रोजी वयाच्या ७५ व्या वर्षी नंदा यांचे हृदयविकाराने निधन झाले.