Join us  

Sushant Singh Rajput Suicide: सुशांतचा 'हेलिकॉप्टर शॉट' पाहून चकीत झालेला धोनी म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2020 6:19 AM

सुशांतसिंह राजपूत याने धोनीची भूमिका साकारताना खेळलेला हेलिकॉप्टर शॉट इतका अचूक होता की, खुुद्द धोनीलाही आश्चर्याचा धक्का बसला होता.​​​​​​

नवी दिल्ली : दिग्गज क्रिकेटपटू महेंद्रसिंह धोनीचा विशेष फटका असलेल्या हेलिकॉप्टर शॉटचा प्रत्येक क्रिकेटप्रेमी चाहता आहे. अनेकांनी त्याच्या या शॉटची नक्कल करण्याचा प्रयत्नही केला. अनेक आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंनी असा फटका खेळलाही; पण त्याला धोनीच्या फटक्याची सर नाही. मात्र, सुशांतसिंह राजपूत याने धोनीची भूमिका साकारताना खेळलेला हेलिकॉप्टर शॉट इतका अचूक होता की, खुुद्द धोनीलाही आश्चर्याचा धक्का बसला होता.अत्यंत गुणवान अभिनेता असलेल्या सुशांतच्या कारकीर्दीमध्ये धोनीची कामगिरी टर्निंग पॉइंट ठरली, असे म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही. ‘एम. एस. धोनी : दी अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटामध्ये धोनीची भूमिका साकारणाऱ्या सुशांतची लोकप्रियता अल्पावधीतच वाढली. धोनीप्रमाणे चालणे, बोलणे ठीक आहे; पण त्याच्या विशिष्ट स्टाईलप्रमाणे खेळणे सुशांतला जमेल का, अशी शंकाही अनेकांनी उपस्थित केली होती. मात्र, सुशांतने सर्वांनाच गप्प केले आणि त्याने या भूमिकेसाठी किती मेहनत घेतली, हे सर्वांनीच मोठ्या पडद्यावर पाहिले. हा चित्रपट प्रदर्शित होण्याआधी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना धोनीने सुशांतच्या अभिनयाचे कौतुक करताना सांगितले होते की, सुशांतने अगदी माझ्याप्रमाणेच हेलिकॉप्टर शॉट खेळला आहे. सुशांतचा हेलिकॉप्टर शॉट माझ्यासारखाच आहे. चित्रीकरणावेळी सरावादरम्यान तो हा फटका अनेकदा माझ्याहून चांगल्या प्रकारे खेळायचा. सुशांतही धोनीचा मोठा चाहता राहिला आहे. त्याने सांगितले होते की, २००४ साली मी धोनीला पहिल्यांदाच पाहिले होते तेही पाकिस्तानविरुद्ध खेळताना. मानेपर्यंत केस ठेवणारा धोनी अत्यंत आत्मविश्वासाने खेळत होता. एका सामन्यात त्याने १४८ धावा चोपल्या. या सामन्यानंतरच मी एक चाहता म्हणून धोनीला फॉलो करीत आलो. २००६-०७ दरम्यान पाकिस्तान विरुद्धच्या सामन्याच्या वेळीच मी पहिल्यांदा धोनीला भेटलो होतो आणि त्याच्यासोबत फोटोही घेतला होता. धोनीशिवाय सुशांत सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवाग यांचाही चाहता होता. (वृत्तसंस्था)दिवसाचे १०-१२ तास सरावधोनीच्या भूमिकेसाठी सुशांतने स्वत:ला इतके समर्पित केले होते की, तो दिवसातील १०-१२ तास क्रिकेटचा सराव करायचा, अशी माहितीही किरण मोरे यांनी दिली होती. ते म्हणाले होते की, कोणत्याही अभिनेत्याला व्यावसायिक क्रिकेटपटूचे गुण शिकवणे अत्यंत कठीण काम आहे; पण सुशांतने आपल्या मेहनतीच्या आणि एकाग्रतेच्या जोरावर हे कठीण काम पूर्ण केले. तो रोज १०-१२ तास सराव करायचा. यामध्ये ५-६ तास तो यष्टीरक्षणाचा सराव करायचा आणि नंतर फलंदाजीचा.किरण मोरेंचे मिळालेले प्रशिक्षणधोनीची भूमिका साकारण्यासाठी सुशांतला भारताचे माजी यष्टीरक्षक किरण मोरे यांचे विशेष मार्गदर्शन मिळाले होते. मोरे यांनी टष्ट्वीट केले की, वैयक्तिकरीत्या माझ्यासाठी हा धक्कादायक प्रसंग आहे. धोनीच्या भूमिकेसाठी मी त्याला प्रशिक्षण दिले होते. त्याला ओळखणारे या प्रसंगातून स्वत:ला कसे सावरतील, याची मला कल्पना नाही. तू खूप लवकर निघून गेलास माझ्या मित्रा.

टॅग्स :सुशांत सिंग रजपूतएम. एस. धोनी