Join us  

त्याचा अर्थ नातं संपलं असा नाही...,लेकाच्या घटस्फोटावर धनुषच्या वडिलांची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2022 11:15 AM

Dhanush's father Kasthuri Raja on his divorce: धनुष आणि ऐश्वर्या दोघांनीही पोस्ट शेअर करत, विभक्त होत असल्याचं जाहिर केलं. अद्याप ऐश्वर्याचे वडील म्हणजेच रजनीकांत यांनी यावर काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही. पण धनुषच्या वडिलांची प्रतिक्रिया मात्र आली आहे.

साऊथचा सुपरस्टार अभिनेता धनुष (Dhanush) आणि ऐश्वर्या रजनीकांत  (Aishwaryaa Rajinikanth) यांनी विभक्त होत असल्याची घोषणा केली आणि सगळ्यांनाच धक्का बसला. गत सोमवारी धनुष आणि ऐश्वर्या दोघांनीही पोस्ट शेअर करत, विभक्त होत असल्याचं जाहिर केलं. अद्याप ऐश्वर्याचे वडील म्हणजेच रजनीकांत यांनी यावर काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही. पण धनुषच्या वडिलांची प्रतिक्रिया मात्र  आली आहे. ऐश्वर्या व धनुष यांच्यातील वाद विवाहित जोडप्यांमध्ये होतो तसा सामान्य वाद आहे, असं धनुषचे वडिल आणि तामिळ चित्रपट निर्माते कस्तुरी राजा (Kasthuri Raja) यांनी म्हटलं आहे.

एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत कस्तुरी राजा म्हणाले, ‘धनुष आणि ऐश्वर्या यांच्यात कौटुंबिक कलह सुरू आहे. सामान्य नवरा-बायकोत होतं तसा हा सामान्य कौटुंबिक कलह आहे. याचा अर्थ नातं संपलं,असा होत नाही. हा घटस्फोट नाही. धनुष आणि ऐश्वर्या सध्या चेन्नईत नाहीत. दोघेही हैदराबादमध्ये आहेत. मी त्या दोघांशी फोनवर बोललो आहे आणि त्या दोघांना समज दिली आहे.

धनुषने ट्विटरवर एक छोटी पोस्ट लिहित घटस्फोट घेत असल्याचं जाहीर केलं होतं.‘18 वर्षांची सोबत. मैत्री, पती-पत्नी, आई-वडील आणि एकमेकांचे शुभचिंतक बनून आम्ही सहजीवनाचा प्रवास केला होता. आज आम्ही आयुष्याच्या अशा टप्प्यावर उभे आहोत, जिथून आमचे मार्ग वेगवेगळे होत आहेत. ऐश्वर्या आणि मी विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही एकमेकांपासून वेगळे होऊन स्वत:चा शोध घेऊ. कृपया आमच्या निर्णयाचा आदर करा आणि आमच्या खाजगीपणाचा आदर ठेवा,’ असं धनुषने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं होतं.

 ऐश्वर्या ही सुपरस्टार रजनीकांत यांची मुलगी आहे, तर धनुष हा प्रसिद्ध निर्माते आणि दिग्दर्शक कस्तुरीराजा यांचा मुलगा. धनुष हा साऊथचा सुपरस्टार आहे तर ऐश्वर्या दिग्दर्शिका आणि पार्श्वगायिका  आहे. धनुष आणि ऐश्वयार्चा 2004मध्ये विवाह झाला होता. त्यांना दोन मुलंही आहेत.

टॅग्स :धनुष