दीपिका पादुकोणने म्हटले, ‘मी लग्नासाठी तयार असून, स्वत:ला आईच्या रूपात पाहू इच्छिते’!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2018 21:49 IST
बॉलिवूडची मस्तानी दीपिका पादुकोण हिच्या लग्नाबद्दल सातत्याने चर्चा रंगत आहेत. आता मस्तानीनेच याबाबतचा एक खुलासा केला असून, त्यामध्ये मी लग्नसाठी तयार असल्याचे तिने म्हटले.
दीपिका पादुकोणने म्हटले, ‘मी लग्नासाठी तयार असून, स्वत:ला आईच्या रूपात पाहू इच्छिते’!
गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडची मस्तानी दीपिका पादुकोण आणि तिचा बॉयफ्रेंड रणवीर सिंगच्या लग्नाच्या चर्चेला उधाण आले आहे. हे दोघे लवकरच लग्नाच्या बंधनात अडकतील अशा शक्यताही सध्या वर्तविली जात आहे. परंतु अद्यापपर्यंत दोघांकडूनही याबाबतचा खुलासा केला नसल्याने या अफवा तर नाहीत ना? असा प्रश्नही काही चाहत्यांकडून उपस्थित केला जात आहे. दरम्यान, या सर्व चर्चांना पूर्णविराम देण्यासाठी दीपिकाने एक खुलासा केला आहे. होय, एका मुलाखतीत दीपिकाने म्हटले की, ‘मी लग्नासाठी तयार आहे. ती एवढ्यावरच थांबली नाही तर, मी स्वत:ला वर्किंग वाईफ आणि आईच्या रूपात पाहू शकते’ असेही म्हटले. काही दिवसांपूर्वीच दीपिकाने पत्रकार अनुपमा चोप्राला एक मुलाखत दिली. त्यात तिने अनेक गोष्टींचा उलगडा केला. दीपिकाने म्हटले की, लग्न माझ्या आयुष्यातील एक महत्त्वाचा भाग आहे. मी माझ्या पालकांना पाहिले आहे आणि मलाही त्यांच्याप्रमाणे आयुष्य हवे आहे. जेव्हा योग्य वेळ असेल तेव्हा मला याची जाणीव होईल आणि माझे लग्न व्हायचे असेल तेव्हा होईल. पुढे बोलताना दीपिकाने म्हटले की, मी कामापासून दूर निघून जाईन, हे माझ्यासाठी खूप कठीण असेल. मला असे वाटते की, घर, परिवार, आई-वडील आणि लग्न माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. यावेळी दीपिकाने चेष्टामस्करीच्या स्वरात म्हटले की, जर मी काम सोडले तर माझ्या आजूबाजूचे लोक वेडे होतील. यावेळी दीपिकाने आपल्या आगामी चित्रपटांबद्दलही माहिती दिली. तिने म्हटले की, पीकू हा एक लहान चित्रपट असला तरी त्यात मोठा अर्थ दडला आहे. मला माझ्या सिनेमात तेच शोधायचे आहे. माझ्यासाठी बजेट महत्त्वाचे नाही. तर गोष्ट महत्त्वाची आहे. दरम्यान, दीपिका बॉलिवूडमधील यशस्वी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. आतापर्यंत तिने अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले. दीपिका सध्या तिच्या आगामी प्रोजेक्टमध्ये व्यस्त आहे. मात्र त्याचबरोबर ती तिच्या लग्नाच्या चर्चेवरूनही चांगलीच माध्यमांमध्ये झळकत आहे. दरम्यान, मधल्या काळात रणवीर आणि तिच्यात ब्रेकअप झाल्याची चर्चा होती. परंतु पुन्हा त्यांनी पॅचअप केल्याचे समोर आले. त्यानंतर दीपिका तिच्या वाढदिवसाला रणवीरसोबत साखरपुडा करणार असल्याचे बोलले जात होते. मात्र हीदेखील अफवा ठरली. आता दीपिका खरच रणवीरसोबत लग्न करणार काय? की हीदेखील अफवा ठरेल याबद्दल तिच्या चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता आहे.