Join us  

एका अपघातामुळे बदलले या अभिनेत्याचे आयुष्य, आता ओळखणे देखील होतंय कठीण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 3:35 PM

या अभिनेत्याला पहिल्याच चित्रपटासाठी पुरस्कार मिळाला होता.

ठळक मुद्दे‘माचिस’ या चित्रपटाने चंद्रचुर सिंगला खरी ओळख दिली. या चित्रपटासाठी त्याला फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा पुरस्कारही मिळाला. ‘चप्पा चप्पा चरखा चले’ या गाण्यातील चंद्रचुर सिंग आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे.

चंद्रचुर सिंगने नव्वदीच्या दशकात अनेक चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या होत्या. पण त्याला बॉलिवूडमध्ये म्हणावं तसं यश मिळालं नाही. माचिसमध्ये तब्बूसोबत तो मुख्य भूमिकेत दिसला होता. त्याचा अभिनय आजही प्रेक्षकांच्या चांगल्याच लक्षात आहे. तेरे मेरे सपने’या चित्रपटाद्वारे चंद्रचुर सिंगने त्याच्या अभिनयकारकिर्दीला सुरुवात केली. पण काहीच वर्षांत तो चित्रपटसृष्टीपासून दूर झाला.

‘माचिस’ या चित्रपटाने चंद्रचुर सिंगला खरी ओळख दिली. या चित्रपटासाठी त्याला फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा पुरस्कारही मिळाला. ‘चप्पा चप्पा चरखा चले’ या गाण्यातील चंद्रचुर सिंग आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. ‘माचिस’ नंतर त्याने दिल क्या करे, दाग द फायर, जोश, क्या कहेना, आमदनी अठ्ठन्नी और खर्चा रूपय्या अशा विविध सिनेमात भूमिका साकारल्या. जोश’मध्ये चंद्रचुर ऐश्वर्या रायसोबत स्क्रिन शेअर करताना दिसला. ऐश्वर्या रायचा चंद्रचुर आवडता अभिनेता होता. खुद्द ऐश्वर्याने एका मुलाखतीत ही कबुली दिली होती. चंद्रचुरने एकापाठोपाठ एक डझनावर चित्रपटांत काम केले. पण यानंतर अचानक तो गायब झाला. त्याला चित्रपटांच्या ऑफर मिळणे बंद झाले आणि चंद्रचुर हळूहळू बॉलिवूडमध्ये दिसेनासा झाला.

याचदरम्यान २००० साली मुंबईत बोटिंग करताना चंद्रचुरला गंभीर अपघात झाला. या अपघातात त्याच्या दोन्ही खांद्यांना जबर दुखापत झाली होती. ही दुखापत इतकी गंभीर होती की त्यातून सावरण्यासाठी त्याला तब्बल १० वर्षं लागली. यात त्याने कमावलेला सगळा पैसा देखील गेला... करिअर ठप्प पडले आणि तो आर्थिक संकटात सापडला.

अर्थात यानंतरही चंद्रचुरने हिंमत सोडली नाही. ‘चार दिन की चांदनी’ या चित्रपटातून त्याने कमबॅक केले. पण त्याचा हा कमबॅक चित्रपट दणकून आपटला. पैशांसाठी या काळात चंद्रचूरने अनेक छोट्या मोठ्या भूमिका साकारल्या. अगदी मिळेल ते काम स्वीकारले. पण त्याच्या करिअरची गाडी पुन्हा रूळावर येऊ शकली नाही. ‘The Reluctant Fundamentalist’ हा त्याचा अखेरचा सिनेमा होता. नुकताच तो सुश्मिता सेनची मुख्य भूमिका असलेल्या आर्या या वेबसिरिजमध्ये झळकला होता. चंद्रचुर आता खूपच बदलला असून त्याला ओळखणे देखील कठीण जात आहे.

टॅग्स :चंद्रचुर सिंग