चक दे इंडिया फेम सागरिका घाटगे या चित्रपटाद्वारे करणार बॉलिवूडमध्ये कमबॅक
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2018 10:43 IST
सागरिका घाटगेने चक दे या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारली होती. या चित्रपटामुळे तिला चांगलीच प्रसिद्धी मिळाली होती. त्यानंतर ती ...
चक दे इंडिया फेम सागरिका घाटगे या चित्रपटाद्वारे करणार बॉलिवूडमध्ये कमबॅक
सागरिका घाटगेने चक दे या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारली होती. या चित्रपटामुळे तिला चांगलीच प्रसिद्धी मिळाली होती. त्यानंतर ती फॉक्स, जी भर के जी ले यांसारख्या चित्रपटांमध्ये झळकली. पण या चित्रपटातील तिच्या भूमिकांना म्हणावा तसा प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला नाही. तिने प्रेमाची गोष्ट या मराठी चित्रपटात देखील काम केले होते. तसेच गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या इरादा या चित्रपटातदेखील ती झळकली होती. सागरिकाने २०१७ मध्ये भारतीय क्रिकेटपट्टू जहिर खानसोबत लग्न केले. जहीर आणि सागरिकाने त्यांच्या लग्नाची घोषणा एप्रिल २०१७ मध्ये केली होती. सागरिका तिच्या व्यवसायिक आयुष्यामुळे चर्चेत नसली तरी तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असते. सागरिकाने लग्नानंतर एकाही चित्रपटात काम केले नव्हते. पण आता ती बॉलिवूडमधील चित्रपटात झळकणार आहे. दिग्दर्शक मिलिंद उकेंच्या आगामी मान्सून फुटबॉल या चित्रपटाद्वारे सागरिका बॉलिवूडमध्ये कमबॅक करत आहे. चक दे हा चित्रपट हॉकी या खेळाशी संबंधित असल्याने चक दे या चित्रपटात सागरिका आपल्याला हॉकी खेळताना दिसली होती तर मान्सून फुटबॉल या चित्रपटाची कथा फूटबॉल या खेळाभोवती फिरत असल्याने या चित्रपटात ती फूटबॉल खेळताना दिसणार आहे. संसार सांभाळता सांभाळता फुटबॉलची टीम स्थापन करणाऱ्या गृहिणींची कथा मान्सून फूटबॉल या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात सागरिका स्वत: गृहिणीची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात काम करण्यास सागरिका खूपच उत्सुक आहे. या चित्रपटाविषयी ती सांगते, खेळाशी संबंधित चित्रपटांशी माझं नाव याआधी देखील जोडलं गेलं असलं तरी अशा भूमिका साकारण्यास मी तयार आहे. मी बोर्डिंग स्कूलमध्ये शिकले आहे. त्यामुळे तिथे मी अनेक खेळ खेळले आहे. पण फुटबॉलशी माझा कधी संबंध आला नव्हता. या चित्रपटामुळे त्याचाही अनुभव घेता येणार आहे .मी फुटबॉलचे प्रशिक्षण घ्यायलाही सुरुवात केली आहे.सागरिका जुलै महिन्यात मान्सून फुटबॉल या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात करणार आहे. Also Read : मालदीव येथे हनिमून ट्रिपवर असलेल्या जहीर खान-सागरिका घाटगेने शेअर केलेले हे खास फोटो!