- Satish Dongare
बॉलिवूडमध्ये एखादा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला की, त्याच विषयाच्या अनुषंगाने सिनेमांची निर्मिती केली जात असल्याचे आपण बघत आलो आहोत. गेल्या काही वर्षांचा विशेषत: २०१६ या वर्षाचा विचार केल्यास बायोपिक सिनेमांनी बॉक्स आॅफिसवर धूम उडवून दिल्याने त्याचा सिलसिला २०१७ मध्येही कायम राहणार आहे. २०१७ हे वर्षही बायोपिकचे वर्ष असल्याने प्रेक्षक त्यास कितपत पसंती देतील हे बघणे औत्सुक्याचे ठरेल. त्याच अनुषंगाने २०१६/१७ मधील बायोपिक सिनेमांचा घेतलेला हा आढावा...२०१६ मधील बायोपिकदंगल२०१६ हे वर्ष खऱ्या अर्थाने बायोपिक वर्ष ठरले आहे. वर्षाच्या अखेरीस आलेल्या आमीर खानच्या दंगल सिनेमा बॉक्स आॅफिसवर कमाईची दंगल करीत याच वर्षातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या सलमान खानच्या ‘सुल्तान’ या सिनेमाला मागे टाकले आहे. दंगल हा सिनेमा महावीर फोगट आणि त्यांच्या पहिलवान मुली गीता, बबिता यांच्या जीवनावर आधारित आहे. या सिनेमाने तीनशे कोटींपेक्षा अधिक कमाई करून बॉक्स आॅफिसवर २०१६ मध्ये सर्वाधिक कमाईचे रेकॉर्ड केले आहे. सिनेमात आमीर खान याने महावीर फोगट याची तर फातिमा सना, सान्या मल्होत्रा, जायरा वासिम, सुहानी भटनागर यांनी त्यांची मुलींची भूमिका साकारली आहे. एमएस धोनी (द अनटोल्ड स्टोरी) भारतीय क्रिकेट संघाचा सर्वाधिक यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्या जीवनावर आधारित असलेल्या एमएस धोनी (द अनटोल्ड स्टोरी) या सिनेमाची बॉक्स आॅफिसवर चांगलीच जादू चालली. कमाईच्याबाबतीत तर सिनेमा आघाडी घेतलीच शिवाय प्रेक्षकांना धोनीचा जीवनपट समजावून सांगण्यातही सिनेमा यशस्वी ठरला. करिअर, लव्ह लाइफ आणि विवाह अशा तीन टप्प्यांमध्ये सिनेमा दाखविण्यात आला. नीरजाअभिनेत्री सोनम कपूर हिच्या करिअरमधील आतापर्यंतचा सर्वात उत्तम सिनेमा म्हणून ‘नीरजा’कडे बघितले जाते. राम माधवानी यांनी दिग्दर्शन केलेला हा सिनेमा नीरजा भनोट यांच्या जीवनावर आधारित आहे. हायजॅक करण्यात आलेल्या फ्लाइटमध्ये नीरजा भनोट यांनी स्वत:चे बलिदान देऊन ३०० प्रवाशांना कसे सुरक्षित बाहेर काढले याची वास्तव कथा या सिनेमात दाखविण्यात आली. प्रेक्षकांना ती चांगलीच भावली. सरबजितउमंग कुमार यांच्या ‘सरबजीत’ या सिनेमानेदेखील सिल्व्हर स्क्र ीनवर सरासरी कमाई केली. रणदीप हुड्डा याने सिनेमात सरबजितची भूमिका साकारली होती. सरबजित त्या भारतीय व्यक्तीची सत्य कथा आहे, ज्याला १९९१ मध्ये पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती. सरबजित हा गुप्तहेर आणि दहशतवादी असल्याचा त्याच्यावर आरोप लावण्यात आला होता. सिनेमात ऐश्वर्या राय-बच्चन हिचीही प्रमुख भूमिका आहे. सरबजितच्या परिवाराने त्याची मुक्तता करण्यासाठी केलेल्या संघर्षाची कथा सिनेमात दाखविण्यात आली आहे. २०१७ मधील बायोपिकसंजय दत्त (संजूबाबा)‘मुन्नाभाई एमबीबीएस’चे दिग्दर्शक राजकुमार हिरानी हे संजूबाबा अर्थात संजय दत्त याच्या जीवनावर बायोपिक काढत आहेत. सिनेमात संजूबाबाची भूमिका रणबीर कपूर साकारणार आहे. संजय दत्तच्या आयुष्यात आतापर्यंत अनेक चढउतार आले असून, ते प्रेक्षकांना पडद्यावर बघावयास मिळणार आहेत. हा सिनेमा ख्रिसमसमध्ये (२२ डिसेंबर २०१७) प्रदर्शित केला जाणार आहे; मात्र याच वेळी सलमान याच्या ‘टायगर’चा सिक्वलही प्रदर्शित केला जाणार असल्याने संजूबाबाच्या बायोपिकच्या प्रदर्शनाच्या तारखेत बदल केला जाण्याची शक्यता आहे.
अक्षय कुमार (पॅडमॅन) बॉलिवूडमध्ये सध्या अक्षय कुमारचा गोल्डन पीरियड सुरू आहे. २०१६ मध्ये लगातार तीन हिट सिनेमे देणारा अक्षय २०१७ मध्ये असाच कारनामा करण्यास तयार आहे. त्याचा सर्वाधिक चर्चेत असलेला पॅडमॅन हा बायोपिक एका वेगळ्या विषयावर आधारित आहे. कारण हा बायोपिक अशा व्यक्तीवर आधारित आहे, ज्याने महिलांसाठी स्वस्तात सॅनेट्री पॅड विकण्यासाठी घरदार सोडले होते. यासाठी त्यांना २०१६ मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानितही केले आहे. ते नाव म्हणजे अरुणाचलम मुरुगनाथम हे आहे. या सिनेमात अक्षयसोबत सोनम कपूर आणि अमिताभ बच्चन यांच्याही भूमिका आहेत.
प्रियांका चोप्रा (गुस्ताखियां) बॉलिवूडबरोबरच हॉलिवूडमध्येही डंका वाजविणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा २०१७ मध्ये दोन सिनेमे येणार आहेत. त्यातील एक बायोपिक असून, संजय लिला भन्साळी हे त्याचे दिग्दर्शन करणार आहेत. प्रसिद्ध गीतकार आणि शायर साहिर लुधियानवी यांचा हा बायोपिक असून, त्यामध्ये प्रसिद्ध लेखिका अमृता प्रीतम यांच्या भूमिकेत प्रियांका दिसणार आहे. सिनेमाचे नाव ‘गुस्ताखियां’ असे निश्चित करण्यात आले असून, प्रियांकासोबत आणखी दोन महत्त्वपूर्ण भूमिका सिनेमात बघावयास मिळतील.
विद्या बालन (आमी) मल्याळी लेखिका आणि कवयित्री कमल सुरैया ऊर्फ माधवी कुट्टी यांच्या जीवनावरही ‘आमी’ नावाची बायोपिक तयार केली जात आहे. या बायोपिकमध्ये अभिनेत्री विद्या बालन ही कमला दास यांची भूमिका साकारणार असल्याचे विद्यानेच गतवर्षी सप्टेंबर महिन्यात ट्विटरच्या माध्यमातून जाहीर केले होते; मात्र सिनेमात दक्षिणपंथीयांच्या उग्र स्वभावाविषयी दाखविण्यात येणार असल्याने विद्याने या सिनेमाला टाटा-बाय बाय केल्याची माहिती समोर येत आहे; मात्र अधिक माहिती अद्यापपर्यंत समोर आलेली नाही. आता या बायोपिकमध्ये विद्याऐवजी दुसरी अभिनेत्री कोण असेल हे बघणे मजेशीर ठरणार आहे. सगळ्या गोष्टी जुळून आल्यास २०१७ च्या अखेरीस हा सिनेमा रिलीज होण्याची शक्यता आहे.