Join us  

Birthday Special : चित्रपटांत येण्यापूर्वी लोकांच्या घरी धुणीभांडी करायच्या टुनटुन, ब्रेक मिळवण्यासाठी दिली होती धमकी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2019 12:07 PM

जवळपास चाळीस- पंचेचाळीस गाणी गायल्यानंतर उमा देवी यांनी आपली वाट बदलत अभिनय क्षेत्रात नवा प्रवास सुरु केला. पण, त्यानंतर मात्र गायिका म्हणून त्यांना पुनरागमन करता आले नाही.

ठळक मुद्दे टुनटुन यांच्या आवाजावर नूरजहाँ आणि बेगम अख्तर यांच्या गायन शैलीचा प्रभाव होता.

1960 च्या दशकात अभिनेत्री टुनटुन या अभिनेत्रीने प्रेक्षकांना खळखळून हसवले. विनोदी अभिनेत्री म्हणून ठसा उमटवणा-या टुनटुन यांचा आज (11 जुलै) वाढदिवस. 2003 मध्ये टुनटुन यांनी जगाचा निरोप घेतला. पण टुनटुन या नावाची जादू आजही कायम आहे.टुनटुन यांचे खरे नाव उमा देवी होते. 11 जुलै 1923 रोजी जन्मलेल्या टुनटुन अभिनेत्री म्हणून नावारूपास आल्या. पण प्रत्यक्षोत त्यांना गायिका व्हायचे होते. बालपणी त्यांना ब-याच खस्ता खाव्या लागल्या.

तीन वर्षांच्या असताना टुनटुन यांच्या माता-पित्याचे निधन झाले. अशात त्यांच्या काकांनी त्यांचा सांभाळ केला. पण यादरम्यान टुनटुन यांना अनेक प्रकारचा अपमान गिळावा लागला. 13 व्या वर्षीच टुनटुन गाऊ लागल्या होत्या.  गायिका होण्याचे स्वप्न मनी बाळगून टुनटुन 13 व्या वर्षी मुंबईत पळून आल्या. मुंबईत ना डोक्यावर छत होते ना हाताला काम. अशास्थितीत त्यांनी अनेकांच्या घरी धुणीभांडी केलीत. पण गायिका बनण्याचे स्वप्न त्यांना स्वस्थ बसू देईना.

याचदरम्यान संगीत दिग्दर्शक नौशाद अली यांच्याशी त्यांची भेट झाले. मी चांगली गाते. तुम्ही मला संधी दिली नाही तर मी समुद्रात जीव देईल, असे टुनटुन नौशाद यांना म्हणाल्या. त्यांचे ते शब्द ऐकून नौशाद यांनी त्यांना लगेच संधी दिली. त्यांनी ‘दर्द’ या चित्रपटातील ‘अफसाना लिख रहीं हूं’ हे गाणे टुनटुनकडून गाऊन घेतले. हे गाणे कमालीचे लोकप्रिय झाले. यानंतर टुनटुन यांनी अनेक चित्रपटात पार्श्वगायन केले.

पुढे नौशाद यांनीच टुनटुन यांना चित्रपटात काम करण्याचा सल्ला दिला. त्यांचा तो सल्ला मानून टुनटुन यांनी ‘बाबुल’ या चित्रपटात पहिल्यांदा दिलीप कुमारसोबत काम केले. दिलीप कुमार यांनीच एका दृश्याच्या चित्रीकरणादरम्यान उमा देवी यांना टुनटुन हे नाव दिले आणि त्यांना ‘टुनटुन’ याच नावाने ओळखले जाऊ लागले. यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. सुमारे 200 चित्रपटांत त्यांनी काम केले. बाज, आरपार, मिस कोका कोला, उडन खटोला. मिस्टर अ‍ॅण्ड मिसेस 55, कभी अंधेरा कभी उजाला, मुजरीम अशा अनेक चित्रपटांचा यात समावेश आहे.