Join us  

Birth Anniversary : बहिणीच्या लग्नात गायलेल्या त्या एका गाण्याने बदलले मुकेश यांचे नशीब!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2018 10:28 AM

बॉलिवूडचे प्रसिध्द गायक मुकेश अर्थात मुकेश चंद्र माथुर यांचा कोण विसरू शकेल. बॉलिवूडचे शो मॅन राज कपूर यांचा आवाज म्हणून ते ओळखले जात. १९२३ साली आजच्याच दिवशी म्हणजे २२ जुलै रोजी दिल्लीत मुकेश यांचा जन्म झाला होता.

बॉलिवूडचे प्रसिध्द गायक मुकेश अर्थात मुकेश चंद्र माथुर यांचा कोण विसरू शकेल. बॉलिवूडचे शो मॅन राज कपूर यांचा आवाज म्हणून ते ओळखले जात. मुकेश यांनी गायलेली अनेक अजरामर गाणी आजही संगीतप्रेमी विसरू शकले नाहीत. नैना है जादू भरे...,मुझको इस रात की तनहाई में...,दीवानों से ये मत पूछो... , कोई जब तुम्हारा ह्रदय तोड दे... जाने कहा गए वो दिन... अशी त्यांनी गायलेली एकापेक्षा एक लोकप्रीय गाणी ‘दर्दी’ चाहत्यांच्या मनात घर करून बसली आहेत. १९२३ साली आजच्याच दिवशी म्हणजे २२ जुलै रोजी दिल्लीत मुकेश यांचा जन्म झाला होता.

मुकेश यांचे वडील जोरावर चंद्र माथुर इंजिनिअर होते आणि आई राणी गृहीणी होत्या. मुकेश यांना संगीतप्रेमाने इतके झपाटले होते की, शिक्षणात त्यांचे मन कधीच रमले नाही. दहावीतचं त्यांनी शिक्षण सोडून दिले आणि एका शासकीय विभागात काम करू लागले. यादरम्यान त्यांनी व्हाइस रेकॉर्डिंग सुरु केले आणि हळू-हळू गायनाच्या क्षेत्रात पाऊल ठेवले. याचदरम्यात न अशी काही घटना घडली की, त्या प्रसंगाने त्यांच्या अख्ख्या आयुष्याला कलाटणी दिली. होय, बहिणीच्या लग्नात मुकेश यांनी गाणे गायले आणि त्या एका गाण्याने मुकेश यांचे आयुष्य बदलले. त्या लग्नात प्रसिध्द अभिनेता मोतीलाल हजर होते. त्यांनी मुकेश यांचा आवाज ऐकला आणि त्यानंतर मोतीलाल यांनीचं मुकेश यांना मुंबईला आणल़े. मुंबईत मोतीलाल यांनी मुकेशला पंडित जगन्नाथ प्रसाद यांच्याकडे सोपवले. मुकेश जगन्नाथ प्रसाद यांच्याकडे संगीताचे धडे गिरवू लागलेत आणि इथेच गायक मुकेश या गायकाचा जन्म झाला.

खरे तर गायनासोबत मुकेश यांना अभिनयातही रस होता. १९४१ मध्ये ‘निर्दोष’ सिनेमात त्यांनी अभिनेता म्हणून काम केले. पण हा चित्रपट आपटला. यानंतर त्यांनी अभिनेता बनण्याचे प्रयत्न सुरू ठेवले. पण नियतीला कदाचित त्यांचे अभिनेता नाही तर गायक बननेच मान्य होते. गायक मुकेश यांना पहिला ब्रेक मोतीलाल यांच्या ‘पहिली नजर’ (1945) सिनेमातून मिळाला. या सिनेमाचे गाणे ‘दिल जलता है तो जलने दो’ खूप लोकप्रिय झाले. त्या नंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही.

मुकेश यांची लव्हलाइफली गाजले. गुजराती मिलेनिअर रायचंद त्रिवेदी यांची मुलही सरला त्रिवेदी हिच्यावर मुकेश यांचे प्रेम होते. पण त्याकाळात सिनेमात गाणे गायच्या करिअरला चांगले मानत नव्हते. म्हणून रायचंद यांची आपल्या मुलीने मुकेशशी विवाह करू नये अशी इच्छा होती. त्यांनी दोघांना वेगळे करण्याचा लाख प्रयत्न केला, मात्र अभिनेते मोतीलाल यांनी मुकेश यांची मदत केली आणि कांदिवलीच्या एका मंदिरात मुकेश यांनी सरलासोबत लग्न केले. विशेष म्हणजे, मुकेश यांचे लग्न त्यांच्या वाढदिवसाच्याच दिवशी झाले. मुकेश आणि सरला यांचा पाच मुले झाली. रीता, नितीन, नलिनी, मोहनीश आणि नम्रता (अमृता). नितानने वडिलांचा मार्ग धरला आणि गायनात करिअर केले. मात्र तो वडिलांप्रमाणे यशस्वी होऊ शकला नाही. मुकेश यांचा नातू नील नितीश मुकेश बॉलिवूडमध्ये अभिनेता म्हणून करिअर करत आहे.

२७ आॅगस्ट १९७६ रोजी डेट्रॉइट, अमेरिकेत मुकेश यांचे निधन झाले होते. ते तिथे एका कॉन्सर्टनिमित्त गेले होते. पण या कॉन्सर्टपूर्वी हृदयविकाराच्या धक्क्याने ते गेलेत. मुकेश यांनी अर्धवट सोडलेले कॉन्सर्ट लता मंगेशकर यांनी पूर्ण केले होते. त्यांनी मुकेश यांचा मृतदेश भारतात आणला होता. मुकेश यांच्या अंत्यसंस्कारात बॉलिवूडचे जवळपास त्याकाळचे सर्वच कलाकार उपस्थित होते.

टॅग्स :मुकेश