Join us  

भानू प्रताप सिंग सांगतोय, अशाप्रकारे सुरू झाला भूतचा प्रवास

By प्राजक्ता चिटणीस | Published: February 23, 2020 6:30 AM

विकी कौशलची मुख्य भूमिका असलेला भूत पार्ट १- द हाँटेड शीप नुकताच प्रदर्शित झाला असून या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

ठळक मुद्देएकेदिवशी करण सर ऑफिसमधून घरी जात असताना शशांकने त्यांना विचारले की, हॉरर चित्रपटाची निर्मिती करायला आवडेल का? त्यावर त्याने होकार दिला असता शशांकने ही कथा त्यांना वाचायला दिली.

भानू प्रताप सिंगने अनेक चित्रपटांसाठी साहाय्यक दिग्दर्शकाची भूमिका बजावली आहे. पहिल्यांदाच तो भूत पार्ट १- द हाँटेड शीप या चित्रपटाद्वारे दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करत आहे. त्याच्या या चित्रपटाच्या अनुभवाविषयी त्याच्याशी मारलेल्या गप्पा...

भूत पार्ट १- द हाँटेड शीप या हॉरर चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये एंट्री करण्याचा विचार कसा केलास?शशांक खेतानने दिग्दर्शित केलेल्या हम्प्टी शर्मा की दुल्हनिया या चित्रपटासाठी मी साहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले होते. आमच्या दोघांची तेव्हापासूनच खूप चांगली मैत्री आहे. मी त्याला या चित्रपटानंतर काही कथा ऐकवल्या होत्या. पण त्याला त्या आवडल्या नाहीत. त्यानंतर काही दिवसांनी मी त्याला भूतची कथा ऐकवली आणि त्याने लगेचच ही कथा खूप छान असून यावर काम करायला सुरुवात कर... असे मला सुचवले. 

धर्मा प्रोडक्शनने कधीच हॉरर चित्रपटाची निर्मिती केलेली नाहीये. करण जोहरला या चित्रपटाची कथा ऐकवल्यावर त्याची पहिली प्रतिक्रिया काय होती?धर्मा प्रोडक्शनने कधीच हॉरर चित्रपटाची निर्मिती केली नसल्याने ते या चित्रपटाची निर्मिती करायला तयार होतील का असा प्रश्न मला देखील पडला होता. एकेदिवशी करण सर ऑफिसमधून घरी जात असताना शशांकने त्यांना विचारले की, हॉरर चित्रपटाची निर्मिती करायला आवडेल का? त्यावर त्याने होकार दिला असता शशांकने ही कथा त्यांना वाचायला दिली. त्यांनी दोनच दिवसांत मला भेटायला बोलावले आणि या चित्रपटाच्या प्रवासाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली.

तुझ्या कुटुंबियातील कोणीच फिल्म इंडस्ट्रीत नसताना तू या इंडस्ट्रीत येण्याचा कसा विचार केलास?माझे वडील वकील तर आई गृहिणी आहे. माझे शिक्षण चंडिगडमध्ये झाले आहे. मला ॲनिमेशनचे शिक्षण घेण्यासाठी परदेशात जायचे होते. पण त्याचवेळी सुभाष घई यांच्या इन्स्टिट्यूटविषयी मला कळले आणि मी तिथे प्रवेश घेतला. पण तिथे गेल्यानंतर मला ॲनिमेशन नव्हे तर फिल्म मेकिंगमध्ये रस असल्याचे मला जाणवले आणि मी या क्षेत्राकडे वळलो. मी अगदी सुरुवातीला इंटर्न असताना एका जाहिरातीच्या चित्रीकरणासाठी एका प्रोडक्शन हाऊससोबत काम केले होते. अशी छोटी-मोठी कामं करत करत मी आज इथपर्यंत पल्ला गाठला.

चित्रपटाच्या चित्रीकरणाचा अनुभव कसा होता?विकीने धर्मासोबत राजी हा चित्रपट केला होता. तो खूप चांगला अभिनेता असल्याची सगळ्यांचीच त्या चित्रपटानंतर खात्री पटली होती. त्याचमुळे या चित्रपटातील मुख्य भूमिकेसाठी त्याची निवड करण्यात आली. त्याच्यासोबत काम करण्याचा अनुभव खूप चांगला होता. या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी आम्ही काही खास लोकेशनची निवड केली. तसेच हा चित्रपट इतर भूतांच्या चित्रपटापेक्षा वेगळा वाटावा यासाठी आम्ही खूप मेहनत घेतली आहे. तसेच या चित्रपटासाठी मी खूप सारे संशोधन केले आहे. हा चित्रपट खूपच चांगल्याप्रकारे बनला असून हा चित्रपट प्रेक्षकांना आवडेल याची मला खात्री आहे.  

टॅग्स :भूत चित्रपट