Join us  

बप्पी लाहिरी सोन्याच्या ताटात नातवाला भरविणार खीर, चार कोटींची कार देणार गिफ्ट!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2018 12:56 PM

प्रसिद्ध गायक बप्पी लाहिरी यांनी नुकतेच त्यांच्या नातवाचे नामकरण केले आहे. हा त्यांचा मोठा मुलगा बप्पा लाहिरी आणि त्याची ...

प्रसिद्ध गायक बप्पी लाहिरी यांनी नुकतेच त्यांच्या नातवाचे नामकरण केले आहे. हा त्यांचा मोठा मुलगा बप्पा लाहिरी आणि त्याची पत्नी तनिशाचा मुलगा आहे. त्याचा जन्म ४ आॅक्टोबर २०१७ रोजी अमेरिकेत झाला. दरम्यान, हा नामकरण सोहळा मुंबईतील जुहू स्थित घरी पार पडला. या नामकरण सोहळ्यात मनोरंजन विश्वातील अनेक सेलिब्रिटींना आमंत्रित करण्यात आले होते. दरम्यान, या सोहळ्यानिमित्त बप्पीदाने एका वेबसाइटला मुलाखत देताना याविषयीची अधिक माहिती दिली. बप्पीदाने म्हटले की, आमचा संपूर्ण परिवाराची परमेश्वरावर श्रद्धा आहे. माझ्या गळ्यात जे सोने आहे, ते सर्वांत अगोदर ‘हरे कृष्ण हरे राम’चे आहे. माझा मुलगा बप्पा लाहिरीच्या स्वप्नात भगवान श्रीकृष्ण आले होते. त्यामुळेच आम्ही सर्वांनी हा विचार केला की, नातवाचे नाव किशेशचंद लाहिरी ठेवायचे. कारण माझ्या वडिलांचे नाव अपरेश लाहिरी आहे. माझे खरे नाव अलिकेश लाहिरी आहे, तर माझ्या मुलाचे नाव अरुणेश (बप्पा) लाहिरी आहे. त्यामुळेच नातवाचे नाव किशेश लाहिरी ठेवणार होते. परंतु माझी पत्नी चित्रा आणि मुलगा बप्पा यांनी त्याचे नाव कृष लाहिरी फायनल केले आहे. यावेळी जेव्हा बप्पी लाहिरी यांना नातवाला काय गिफ्ट देणार आहात? असे विचारले तेव्हा त्यांनी सांगितले की, त्याला सोन्याच्या ताटात खीर भरविणार. आमच्या घरात भगवान कृष्णाची खूप मोठी मूर्ती असून, त्यांच्याकडे सर्वांच्या सुखी आयुष्यासाठी प्रार्थना करणार. आमच्या कुटुंबात सोने खूप लकी आहे. त्यामुळे मी निश्चय केला की, त्याला डायमंड पेंडल देणार. त्यावर कृष नावातील पहिले ‘के’ हे अक्षर असेल. त्याचबरोबर कृषच्या पहिल्या वाढदिवसासाठी त्याच्या डॅडीने बेंटले कार बुक केली आहे. ही कार चार महिन्यांत आमच्या दारात उभी असेल. या कारची किंमत सुमारे ३ ते ४ कोटी इतकी आहे.