‘बाहुबली’ने बॉक्स आॅफिसवर रचला इतिहास; शंभराव्या दिवशीही ‘बाहुबली’चाच बोलबाला !
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2017 15:01 IST
अभिनेता प्रभास आणि राणा दुग्गुबत्ती यांच्या ‘बाहुबली-२’ने बॉक्स आॅफिसवरील जवळपास सर्व रेकॉर्डवर नाव कोरले आहे. आता आणखी एक रेकॉर्ड ...
‘बाहुबली’ने बॉक्स आॅफिसवर रचला इतिहास; शंभराव्या दिवशीही ‘बाहुबली’चाच बोलबाला !
अभिनेता प्रभास आणि राणा दुग्गुबत्ती यांच्या ‘बाहुबली-२’ने बॉक्स आॅफिसवरील जवळपास सर्व रेकॉर्डवर नाव कोरले आहे. आता आणखी एक रेकॉर्ड ‘बाहुबली’ने रचला आहे. होय, गेल्या काही काळाचा विचार केल्यास एकाही चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर शंभर दिवस पूर्ण केले नाहीत. परंतु एस. एस. राजामौली यांच्या ‘बाहुबली-२’ने बॉक्स आॅफिसवर शंभर दिवस पूर्ण करीत इतिहास रचला आहे. हा रेकॉर्ड रचताना ‘बाहुबली-२’ने दिग्गज सेलिब्रिटींच्या चित्रपटांचा सामना केला. त्यामध्ये सलमान खान याच्या ‘ट्यूबलाइट’, अर्जुन कपूरच्या ‘मुबारका’ आणि शाहरूख खानचा नुकताच रिलीज झालेला ‘जब हॅरी मेट सेजल’ या चित्रपटांचा समावेश आहे. ‘बाहुबली-२’चा प्रभाव ऐवढा होता की, प्रेक्षकांनी इतर चित्रपटांना फारसा थारा न देता ‘बाहुबली’ला पसंती दिली. ‘बाहुबली-२’ रिलीज झाल्याच्या दुसºया आठवड्यानंतर रिलीज झालेले चित्रपट तर कदाचित प्रेक्षकांना आठवतही नसतील, कारण हे चित्रपट केव्हा रिलीज झाले अन् चित्रपटगृहातून गेले हे प्रेक्षकांना कळालेच नाही. कारण त्यांच्यावर केवळ ‘बाहुबली-२’ची धूंद होती अन् आहे. आतापर्यंत चित्रपटाने वर्ल्डवाइज दोन हजार कोटींच्या आसपास व्यवसाय केला आहे. त्याचबरोबर आमिर खानच्या ‘दंगल’नंतर आत ‘बाहुबली’ चीनमध्ये जलवा दाखवित आहे. कारण बाहुबलीची झिंग चीनमधील चाहत्यांनाही चढली असल्याचे दिसत आहे. असो, ‘बाहुबली-२’ने इतिहास रचताना चित्रपटातील सर्व पात्र अजरामर केले आहे. प्रभास तर रातोरात सुपरस्टार झाला असून, साउथ इंडस्ट्रीनंतर त्याच्यासाठी बॉलिवूडचे सर्व दरवाजे उघडले आहेत. त्याचबरोबर अभिनेत्री अनुष्का शेट्टी आणि प्रभास ही जोडी सध्या चाहत्यांच्या मनात घर करून आहे. या जोडीने बॉलिवूडमधील ‘खान’ त्रिकुटाला मागे सारले असल्याचे दिसून येत आहे. मात्र जोपर्यंत प्रभास आणि अनुष्का बॉलिवूडपटांमध्ये झळकत नाही, तोपर्यंत त्यांचे बॉलिवूडमधील स्टारडम सिद्ध होणार नाही, असा सूर व्यक्त केला जात आहे. दरम्यान, या दोघांना सध्या बॉलिवूडमधून प्रचंड आॅफर्स असून, ते कुठल्या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू करतील हे बघणे औत्सुक्याचे ठरेल. सध्या प्रभास त्याच्या आगामी ‘साहो’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात अनुष्का शेट्टी त्याच्याबरोबर रोमान्स करणार असल्याची चर्चा होती. परंतु आता तिचा पत्ता कट करण्यात आला असून, तिच्याऐवजी श्रद्धा कपूर हिचे नाव समोर आले आहे. अनुष्कानेही एक तेलगू चित्रपट साइन केला असून, तीदेखील चित्रपटाच्या शूटिंगला लवकरच सुरुवात करणार आहे. तर चित्रपटाचे दिग्दर्शक एस. एस. राजामौली सध्या ‘महाभारत’वर काम करीत आहेत.