Join us  

'आज बाबा हवे होते...'; 'ड्रीम गर्ल 2'चं यश पाहून आयुषमान झाला भावुक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2023 5:45 PM

‘ड्रीम गर्ल २’ला मिळालेल यश पाहून आयुषमानला त्याच्या वडिलांची आठवण आलीय.

सध्या बॉलिवूडमध्ये सीक्वेलचा ट्रेंड आल्याचं पाहायला मिळत आहे. ‘ओएमजी २’, ‘गदर २’ नंतर  २५ ऑगस्टला शुक्रवारी आयुषमान खुरानाचा ‘ड्रीम गर्ल २’ हा सिनेमा प्रदर्शित झाला. २०१९ साली प्रदर्शित झालेल्या ‘ड्रीम गर्ल’चा हा सीक्वेल आहे. आयुषमान खुरानाच्या या कॉमेडी चित्रपटाने प्रेक्षकांना लोटपोट हसवलं होतं. त्यामुळेच या चित्रपटाच्या सीक्वेलसाठी प्रेक्षक उत्सुक होते. ‘ड्रीम गर्ल २’च्या ट्रेलरलाही प्रेक्षकांनी पसंती दर्शविली होती. आता ‘ड्रीम गर्ल’प्रमाणेच त्याचा सीक्वेलही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. ‘ड्रीम गर्ल २’ला मिळालेल यश पाहून आयुषमानला त्याच्या वडिलांची आठवण आलीय. 

आयुषमानच्या वडिलांना त्याचा 'ड्रीम गर्ल 2' सिनेमा पाहण्याची इच्छा होती. मात्र हा सिनेमा रिलीज होण्या आधीच त्यांनी जगाचा निरोप घेतला. त्यामुळे  सिनेमाचे यश पाहून वडिलांच्या आठवणीत अभिनेता भावूक झाला आहे. आयुषमान म्हणाला, ''माझ्या वडिलांनी  'ड्रीम गर्ल 2' पाहायला हवा होता. ड्रीम गर्ल हा त्यांचा आवडता चित्रपट होता. मी काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न कसा केला याचा त्यांना खूप अभिमान होता. 'ड्रीम गर्ल 2' ही त्यांना नक्कीच आवडला असता. हा सिनेमा पाहून ते मनापासून हसले असते. मी आज हे काही आहे ते त्यांच्यामुळेच.  मला विश्वास आहे ते जिथे कुठे असतील तिथून मला आशिर्वाद देत असतील.'' 

चंदिगड करे आशिकी, अनेक, डॉक्टर जी आणि अक्शन हिरो असे लागोपाठ चार चित्रपट फ्लॉप ठरल्यानंतर आयुष्मानच्या ‘ड्रीम गर्ल २’ सिनेमाला बॉक्स ऑफिसवर चांगली ओपनिंग मिळाली आहे.  ‘ड्रीम गर्ल’ने बॉक्स ऑफिसवर एकूण १४२ कोटींचा गल्ला जमवला होता. आयुष्मान खुरानाच्या बॉलिवूड करिअरमधील हा सगळ्यात जास्त कमाई करणारा सुपरहिट चित्रपट ठरला होता.

आयुष्मान खुरानाबरोबरच ‘ड्रीम गर्ल २’मध्ये बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटात परेश रावल, विजय राज, राजपाल यादव, अन्नू कपूर, अभिषेक बॅनर्जी या कलाकारांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. 

टॅग्स :आयुषमान खुराणा