Join us  

कविता लिहायला या गोष्टींमुळे मिळते प्रेरणा, सांगतोय आयुषमान खुराणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 4:50 PM

आयुषमान हा केवळ खूप चांगला अभिनेताच नव्हे तर चांगला गीतकार आणि गायक देखील आहे.

ठळक मुद्देआयुषमान सांगतो, "काव्य हे माझ्यासाठी आयुष्याचे, प्रेमाचे, दु:खाचे, वेदनेचे, अनुभवाचे व्यक्तीकरण आहे. एक व्यक्ती म्हणून माझ्या आयुष्याच्या भूतकाळ व वर्तमानातील प्रत्येक क्षणात डोकावून बघण्याची कविता ही एक खिडकी आहे.

बॉलिवूड स्टार आयुषमान खुरानाचे कवितेवरील प्रेम लपून राहिलेले नाही. तो स्वत: आयुष्य, प्रेम व विचारांवर लिहिलेल्या आत्म्याचा तळ खरोखर ढवळून टाकणाऱ्या कविता शेअर करत असतो आणि तो कविता वाचण्यासही खूप उत्सुक असतो. कोविड-१९ साथीच्या काळात लोकांना भोगाव्या लागणाऱ्या कष्टांवरील कवितांसह त्याच्या अन्य अनेक कविताही इंटरनेटवर लोकप्रिय आहेत. त्यातील काही कवितांचा समावेश सोशल मीडियावर सर्वाधिक शेअर्ड पीसेसमध्ये होतो. जागतिक काव्य दिनाच्या निमित्ताने काव्याने आयुष्यमानच्या व्यक्तिमत्वाला कसा आकार दिला, त्याला कशी प्रेरणा दिली आणि त्याला एक विचारी माणूस कसे केले याबद्दल सांगितले आहे.

आयुषमान सांगतो, "काव्य हे माझ्यासाठी आयुष्याचे, प्रेमाचे, दु:खाचे, वेदनेचे, अनुभवाचे व्यक्तीकरण आहे. एक व्यक्ती म्हणून माझ्या आयुष्याच्या भूतकाळ व वर्तमानातील प्रत्येक क्षणात डोकावून बघण्याची कविता ही एक खिडकी आहे. कविता पूर्णपणे कल्पनेतून साकारलेलीही असू शकते. कवितेतून काळाकुट्ट अंध:कार किंवा अत्यानंद व्यक्त करण्यासाठी कवीने या भावनांचा प्रत्यक्षात अनुभव घेतलेला असलाच पाहिजे असे नाही. कवीमध्ये केवळ या भावना समजून घेण्याची क्षमता असली पाहिजे."

आयुष्यमान पुढे सांगतो, "माझ्यासाठी कविता हा भविष्यकालीन जगातील शक्यतांची दिवास्वप्ने बघण्याचाही मार्ग आहे. मी संपूर्ण आयुष्य कवितेवर मनापासून प्रेम केले आहे आणि मी स्वत:ला एक नवोदित कवी समजतो. रॉबर्ट ग्रेव्ह्ज एकदा म्हणाले होते, 'कवी असणे ही एक स्थिती आहे’आणि हे मला पूर्णपणे मान्य आहे. प्रत्येक मानवाने विचार केला पाहिजे; आपल्या भावना, आयुष्यातील प्रवास, श्रद्धा आणि अनुभवांचा पुन:पुन्हा आढावा घेतला पाहिजे, त्या आठवून बघितल्या पाहिजेत, असे मला वाटते."

आयुष्यमानच्या आयुष्यात कवितेला खूपच विशेष स्थान आहे. तो सांगतो, "माझ्यासाठी काव्य हा माझ्या आत्म्याचा आरसा आहे आणि मी जेव्हा लिहिण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा हा आरसा धरून ठेवण्याचा व त्यातील प्रतिबिंब बघण्याचा माझा प्रयत्न असतो. मी खूपच उत्कटपणे जगणारा माणूस आहे आणि मला काव्य नेहमीच आतून उमललेले व आतील प्रेरणेवर आधारित वाटत आले आहे."

आपले विचार लेखनातून मांडण्यास आयुष्यमान सर्वांना प्रोत्साहन देतो, कारण, त्याच्या मते ही प्रक्रिया मन मोकळे करणारी आहे. तो सांगतो, "मी प्रत्येकाला लिहिण्यासाठी प्रोत्साहन देतो. ते लेखन चांगले असेल की वाईट याचा विचार न करता लिहिले पाहिजे. कारण, आपल्या भावनांवर कोणीही चांगल्या किंवा वाईट असा शिक्का मारू शकत नाही. मात्र, त्या लिहून काढल्यामुळे त्यांतील गोंधळ बऱ्यापैकी स्पष्ट होत जातो, आपण दररोज अनुभवत असलेल्या नाजूक भावना त्यांच्याबद्दल लिहिल्यामुळे स्थिर होतात."

टॅग्स :आयुषमान खुराणा