‘काश्मीरच्या आशा भोसले’ राज बेगम कालवश
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2016 17:59 IST
गत सात दशकांपासून कोट्यवधी श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारा एक आवाज आज कायमचा शांत झाला. पद्मश्री पुरस्कारप्राप्त काश्मिरी गायिका राज बेगम ...
‘काश्मीरच्या आशा भोसले’ राज बेगम कालवश
गत सात दशकांपासून कोट्यवधी श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारा एक आवाज आज कायमचा शांत झाला. पद्मश्री पुरस्कारप्राप्त काश्मिरी गायिका राज बेगम यांचे आज बुधवारी दीर्घ आजाराने निधन झाले. त्या ८९ वर्षांच्या होत्या. ‘काश्मीरच्या आशा भोसले’ या नावाने त्या लोकप्रीय होत्या.त्यांच्यामागे दोन मुले, एक मुलगी व बराच मोठा आप्तपरिवार आहे. १९२७ साली जन्मलेल्या राज बेगम यांना सन २००२ मध्ये पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले होते. २०१३ मध्ये त्यांना संगीत नाट्य अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अगदी लहानवयात राज बेगम यांनी गायला सुरुवात केली. यानंतर त्या विवाह सोहळ्यांत गाण्याचे कार्यक्रम करू लागल्या. १९४७मध्ये रेडिओ काश्मिरवर गीत गाणाºया काही निवडक कलाकारांमध्ये त्यांचा समावेश होता. त्याकाळात रेकॉर्डिंगची कुठलीही व्यवस्था नव्हती. कार्यक्रमाचे थेट प्रसारण व्हायचे. राज बेगम गायला लागल्या त्या काळात महिलेने गाणे फारसे चांगले मानले जात नव्हते. पण राज बेगम यांनी अगदी नेटाने आपली कला जगापुढे आणली आणि आपल्या गाण्याने त्यांनी फार कमी काळात श्रोत्यांना वेड लावले. देशाच्या विविध भागात त्यांनी कार्यक्रम केलेत. १९८६ मध्ये त्या रेडिओ काश्मिरमधून निवृत्त झाल्या.काही महिन्यांपासून वृद्धापकाळाने त्या आजारी होत्या. आज अखेर त्यांनी अंतिम श्वास घेतला.