बॉलिवूड अभिनेता अरबाज खानने काही दिवसांपूर्वीच दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधत नव्या आयुष्याला सुरुवात केली. अरबाजने डिसेंबर महिन्यात मेकअप आर्टिस्ट शूरा खानशी निकाह केला. ५६व्या वर्षी अरबाजने पुन्हा त्याच्या वैवाहिक जीवनाला सुरुवात केली आहे. लग्नानंतर अरबाज आणि शूराला अनेक ठिकाणी एकत्र स्पॉट करण्यात आलं होतं. आता लग्नानंतर पहिल्यांदाच अरबाजने त्याच्या दुसऱ्या पत्नीसाठी पोस्ट शेअर केली आहे.
अरबाजची दुसरी पत्नी शूरा हिचा आज वाढदिवस आहे. पत्नीच्या वाढदिवसानिमित्त अरबाजने तिच्याबरोबरचा एक फोटो शेअर करत खास पोस्ट लिहिली आहे. "हॅपी बर्थडे माय लव्ह शूरा. तू ज्या पद्धतीने मला हसवते. तसं इतर कोणीच करू शकत नाही. तू माझं आयुष्य उजळून टाकलं आहेस. तुझ्याबरोबर मला म्हातारं व्हायचं आहे. जेव्हा नियतीने आपली भेट घडवून दिली. माझ्या आयुष्या घडलेली ती सगळ्यात चांगली गोष्ट आहे. पहिल्या डेटपासूनच मला माहीत होतं की मी माझं पुढचं आयुष्य तुझ्याबरोबर घालवणार आहे. तुझं सौंदर्य आणि दयाळूपणा याने मी भारावून गेलो आहे. तुला मी कबूल है म्हणालो ते माझ्या तोंडून आत्तापर्यंत निघालेले सर्वात चांगले शब्द आहेत. लव्ह यू", असं अरबाजने पोस्टमध्ये म्हटलं आहे. अरबाजच्या या पोस्टवर चाहत्यांबरोबर सेलिब्रिटींनीही कमेंट करत शूराला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
अरबाजने १९९८ मध्ये बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराशी विवाह केला होता. जवळपास १९ वर्षांच्या संसारानंतर २०१७ मध्ये घटस्फोट घेत ते एकमेकांपासून वेगळे झाले. या दोघांना अरहान हा मुलगा असून घटस्फोटानंतरही ही जोडी त्याचा व्यवस्थित सांभाळ करत आहेत. मलायकाशी घटस्फोट घेतल्यानंतर अरबाज मॉडेल जॉर्जिया एंड्रियाला डेट करत होता. त्यानंतर त्याने शूराशी निकाह करत नव्याने संसार थाटला आहे.