Join us  

अंगिरा धर सांगतेय, अभिनयासोबतच भविष्यात करायची आहे ही गोष्ट

By प्राजक्ता चिटणीस | Published: November 23, 2019 6:00 AM

अंगिरा धरने विकी कौशलसोबत लव्ह पर स्क्वेअर फूटमध्ये काम केले होते. आता ती कमांडो 3 या चित्रपटात दिसणार आहे.

ठळक मुद्देअंगिरा सांगते, मी अनेक वर्षांपासून लेखन करते. त्यामुळे भविष्यात एखाद्या प्रोजेक्टसाठी पटकथा लिहिण्याचा अथवा दिग्दर्शन करण्याचा मी नक्कीच विचार करेन. 

कमांडो 3 या चित्रपटात अंगिरा धर प्रेक्षकांना एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. तिने विकी कौशल सोबत नुकतेच एका चित्रपटात काम केले होते. आता कमांडो 3 मध्ये ती अभिनयासोबतच अ‍ॅक्शन करताना दिसताना आहे. तिच्या या भूमिकेबाबत तिच्याशी मारलेल्या गप्पा...

कमांडो 3 या चित्रपटात काम करण्यासाठी तू किती उत्सुक होतीस?कमांडो या चित्रपटाचे आतापर्यंत दोन भाग प्रेक्षकांच्या भेटीस आले आहेत. हे दोन्ही भाग प्रेक्षकांना प्रचंड आवडले असून हे दोन्ही चित्रपट मी प्रेक्षक म्हणून पाहिले होते. मला अ‍ॅक्शन चित्रपट पाहायला खूप आवडतात आणि त्यातही मी विद्युत जामवालची खूप मोठी फॅन आहे. त्यामुळे या चित्रपटात काम करण्यासाठी मी खूप उत्सुक होते. या चित्रपटाविषयी मला ज्यावेळी पहिल्यांदा सांगण्यात आले, त्यावेळी या चित्रपटात माझ्यावर अ‍ॅक्शन दृश्य चित्रीत केले जाणार याविषयी मला माहीत नव्हते. पण मला देखील अ‍ॅक्शन करायचे आहे हे कळल्यावर मी प्रचंड खूप झाले होते. मी या चित्रपटासाठी विशेष शारीरिक मेहनत घेतली असून या चित्रपटामुळे माझे अ‍ॅक्शन चित्रपटात काम करण्याचे स्वप्न पूर्ण झाले. 

तू कॅमेऱ्याचे मागे अनेक वर्षं काम केले आहेस, याचा तुला अभिनय करताना किती फायदा होतो? मी अनेक वर्षं कॅमेऱ्याच्या मागे काम करत आहे. मला स्वतःला वाटते की, तुम्हाला पटकथा वाचायची सवय असल्याने एखादी पटकथा तुमच्यासाठी योग्य आहे की, नाही हे तुम्हाला लगेचच कळते. मी अनेक वर्षं कॅमेऱ्याच्या मागे काम करत असल्याने याचा मला अभिनय करताना नक्कीच उपयोग होतो. मी अनेक वर्षांपासून लेखन करते. त्यामुळे भविष्यात एखाद्या प्रोजेक्टसाठी पटकथा लिहिण्याचा अथवा दिग्दर्शन करण्याचा मी नक्कीच विचार करेन. 

डिजीटल माध्यमामुळे या क्षेत्रात येणाऱ्या नवोदितांना चांगल्या संधी मिळत आहेत असे तुला वाटते का?डिजीटल क्षेत्रामुळे अभिनयक्षेत्रात येणाऱ्या नवोदितांना अनेक नवीन संधी मिळत आहेत. हे एक चांगले माध्यम असून आपले अभिनय कौशल्य दाखवायला नवोदितांना एक प्लॅटफॉर्म मिळाला आहे. याच माध्यमामुळे मला माझ्या कारकिर्दीच्या सुरुवातीला विकी कौशलसारख्या अभिनेत्यासोबत काम करण्याची संधी मिळाली.

या चित्रपटात काम करण्याचा अनुभव कसा होता?या चित्रपटाच्याआधी मी विद्युतला ओळखत देखील नव्हती. त्याला मी अ‍ॅक्शन हिरो म्हणून चित्रपटांमध्ये पाहिले होते. पण चित्रीकरणादरम्यान मला त्याचा कॉमिक अंदाज देखील पाहायला मिळाला. दृश्याचे चित्रण करताना बंदूक कशाप्रकारे पकडायची. बॉडी लँग्वेज कशाप्रकारे असली पाहिजे याचा सल्ला तो मला चित्रीकरणाच्यावेळी आवर्जून द्यायचा. तर या चित्रपटासाठी मी सगळ्यात जास्त चित्रीकरण अदा शर्मासोबत केले आहे. आमच्या दोघांच्या व्यक्तिरेखा खूप चांगल्या आणि वेगळ्या असून आम्हाला अभिनय करण्यास खूप चांगला वाव मिळाला आहे. 

टॅग्स :कमांडो