Join us  

अमिताभ बच्चन यांनी चाहत्यांसोबत शेअर केला ‘हा’ अनुभव; वाचून तुम्हालाही वाटेल त्यांची काळजी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2020 6:51 PM

मुंबईतील नानावटी रुग्णालयातील आयसोलेशन वॉर्डमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या पंधरा दिवसात त्यांच्यावर कसे उपचार होत आहेत, कोरोनाशी लढा देताना त्यांना कोणत्या परिस्थितीतून जावं लागतं आहे, याबाबत अमिताभ व्यक्त झाले आहेत.

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांचे कोटींच्या घरात दिवाने आहेत. त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर देखील चाहते प्रचंड प्रतिसाद देतात. ते अशातच कोरोनाचा संसर्ग झाल्याने रुग्णालयात उपचार घेत आहेत. याला १५ दिवस झालेत. मुंबईतील नानावटी रुग्णालयातील आयसोलेशन वॉर्डमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या पंधरा दिवसात त्यांच्यावर कसे उपचार होत आहेत, कोरोनाशी लढा देताना त्यांना कोणत्या परिस्थितीतून जावं लागतं आहे, याबाबत अमिताभ व्यक्त झाले आहेत. आपल्या ब्लॉगमार्फत त्यांनी तिथे घेतलेला संपूर्ण अनुभव कथन केला आहे.

अमिताभ म्हणाले, ‘उपचारादरम्यान आठवडाभर रुग्णाला दुसरा माणूसच दिसत नाही. मेडिसीन केअरसाठी नर्स आणि डॉक्टर्स येतात मात्र ते पीपीई सूटमध्ये असता. ते कोण आहेत हे तुम्हाला समजत नाही. त्यांचे हावभाव तुम्हाला दिसत नाहीत. त्यांची उपस्थिती रोबोटिक असते. ते आपलं काम करतात आणि निघून जातात. जास्त वेळ थांबल्याने त्यांनाही संक्रमणची भीती असते. ज्या डॉक्टराच्या निगरानीत कोविड रुग्णावर उपचार होतात. ते डॉक्टर कधीच त्याच रुग्णाच्या जवळ येत नाहीत किंवा त्याला कसलं आश्वासन देत नाही. व्हिडीओमार्फत ते संवाद साधतात. सध्याची परिस्थिती पाहता हे योग्यदेखील आहे. मात्र याचा मानसिक परिणाम होतो का? मानसशास्त्रज्ञ सांगतात ‘हो’ होतो. डिस्चार्ज मिळाल्यानंतर रुग्णाला राग येतो. ते बाहेर जायला घाबरू लागतात. आपल्याला वेगळी वागणूक दिली जाईल याची भीती त्यांच्या मनात असते, जसं काय ते आजाराला आपल्यासोबत घेऊन जात असतात. हा एक पॅरिया सिंड्रोम आहे. जो त्यांना अशा डिप्रेशन आणि एकटेपणात घेऊन जातो,’ असं अमिताभ म्हणतात.

अभिनेते अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्यावर ११ जुलैपासून मुंबईतील नानावटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर ऐश्वर्या राय बच्चन आणि आराध्या बच्चन यांना १७ जुलैला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. अजून त्यांना किती दिवस रुग्णालयात राहावं लागेल याबाबत बच्चन कुटुंबाकडून काही माहिती देण्यात आलेली नाही. मात्र अमिताभ सातत्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या आरोग्याबाबत माहिती देत आहेत आणि चाहत्यांशी संवाद साधत आहेत.

टॅग्स :अमिताभ बच्चनकोरोना वायरस बातम्या