Join us  

निर्मात्याने म्हटले, अमिषा पटेलने दिले नाहीत माझे अडीच कोटी रुपये

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2019 12:07 PM

अमिषा पटेल आणि तिचा व्यवसायिक जोडीदार कुणाल गुमर यांनी अडीच कोटी रुपयांसाठी फसवल्याचा आरोप अजय कुमार सिंग या निर्मात्याने केला आहे.

ठळक मुद्देगेल्या वर्षी मार्च महिन्यात अमिषा आणि कुणाल रांचीला एका इव्हेंटसाठी आले होते. त्यावेळी मी त्या दोघांना अडीच कोटी उसने दिले होते. त्यांनी मला सांगितले होते की, त्यांचा चित्रपट जून २०१८ मध्ये प्रदर्शित होणार होता.

अमिषा पटेलने कहो ना प्यार है या चित्रपटापासून तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर ती गदर एक प्रेम कथा, हमराज यांसारख्या चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या होत्या. पण गेल्या अनेक वर्षांपासून तिला एकही हिट चित्रपट देता आलेला नाहीये. ती बॉलिवूड पार्टी, पुरस्कार सोहळ्याला आवर्जून उपस्थित राहात असली तरी तिचे फॅन फॉलोव्हिंग गेल्या काही वर्षांत खूपच कमी झाले आहे. आता अमिषा पटेलने अडीच कोटी रुपयांसाठी फसवल्याचा आरोप एका निर्मात्याने केला आहे. 

अमिषा पटेल आणि तिचा व्यवसायिक जोडीदार कुणाल गुमर यांनी अडीच कोटी रुपयांसाठी फसवल्याचा आरोप अजय कुमार सिंग या निर्मात्याने केला आहे. इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार देसी मॅजिक हा चित्रपट बनवण्यासाठी अमिषा आणि कुणाल यांनी अजयकडून पैसे घतले होते. अजयने अमिषा आणि कुणाल यांच्याविरोधात फसवणुकीची आणि चेक बाऊन्सची तक्रार रांची कोर्टामध्ये दाखल केली आहे. 

देसी मॅजिक हा कुणाल घुमर आणि अमिषा पटेलची निर्मिती असलेला पहिला चित्रपट होता. या चित्रपटात अमिषा पटेल, ईशा गुप्ता, झायद खान, साहिल श्रॉफ यांच्या मुख्य भूमिका होत्या. या चित्रपटाचे चित्रीकरण २०१३ मध्ये सुरू झाले होते. पण त्यानंतर या चित्रपटाबद्दल काहीही माहिती आली नाही.

अजय कुमारने इंडिया टुडेशी बोलताना याविषयी सांगितले की, गेल्या वर्षी मार्च महिन्यात अमिषा आणि कुणाल रांचीला एका इव्हेंटसाठी आले होते. त्यावेळी मी त्या दोघांना अडीच कोटी उसने दिले होते. त्यांनी मला सांगितले होते की, त्यांचा चित्रपट जून २०१८ मध्ये प्रदर्शित होणार होता. या चित्रपटाद्वारे चांगलाच नफा मिळेल असे मला सांगण्यात आले होते. पण हा चित्रपट प्रदर्शितच झाला नाही. त्यामुळे मी माझ्या पैशांबद्दल त्यांना विचारले असता त्यांनी दोन-तीन महिन्यांत पैसे परत करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर त्यांनी मला तीन करोडचा चेक दिला. पण तो बाऊन्स झाला. मी त्यांना याबद्दल विचारले असता पैसे परत करण्याऐवजी ते टाळाटाळ करत होते. त्यांनी मला अमिषाचे फोटो काही प्रसिद्ध व्यक्तींसोबत दाखवून धमकी देखील दिली. तसेच हा चित्रपट या वर्षी प्रदर्शित होईल असे त्यांनी मला सांगितले. पण मला अद्याप तरी त्याबद्दल काहीही माहिती मिळालेली नाहीये. 

टॅग्स :अमिषा पटेल