Join us  

​आलिया भट्ट दिसणार चालबाजच्या रिमेकमध्ये?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 09, 2017 6:40 AM

चालबाज या चित्रपटात श्रीदेवीने डबल रोल साकारला होता. अतिशय साधी अंजू आणि अतिशय मस्तीखोर मंजू अशा दोन वेगवेगळ्या भूमिकेत ...

चालबाज या चित्रपटात श्रीदेवीने डबल रोल साकारला होता. अतिशय साधी अंजू आणि अतिशय मस्तीखोर मंजू अशा दोन वेगवेगळ्या भूमिकेत प्रेक्षकांना तिला या चित्रपटात पाहायला मिळाले होते. या चित्रपटात श्रीदेवीसोबतच सनी देओल, रजनिकांत यांच्या मुख्य भूमिका होत्या. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच व्यवसाय केला होता. या चित्रपटातील श्रीदेवीच्या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते. या चित्रपटातील भूमिकेसाठी श्रीदेवीला अनेक पुरस्काराने सन्मानित देखील करण्यात आले आहे. चालबाज या चित्रपटाची कथा ही राम और श्याम, सीता और गीता यांसारख्या चित्रपटांसारखीच होती. या चित्रपटाच्या कथेत नावीण्य नसले तरी श्रीदेवीने तिच्या अभिनयाने या चित्रपटाला चार चाँद लावले होते. प्रेक्षकांच्या आवडत्या चालबाज या चित्रपटाचा आता रिमेक बनवला जाणार असून या चित्रपटाच्या रिमेकच्या तयारीला लवकरच सुरुवात होणार आहे. या चित्रपटाच्या रिमेकचे दिग्दर्शन डेव्हिड धवन करणार आहेत. डेव्हिड यांनी याआधी अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. मूळ चालबाज या चित्रपटाचे दिग्दर्शन पंकज पराशर यांनी केले होते. आता डेव्हिड धवन त्यांच्या अंदाजात या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. चालबाज या चित्रपटात श्रीदेवीची भूमिका साकारण्यासाठी आलिया भट्टचा विचार केला जात असल्याची जोरदार चर्चा आहे. आलिया ही चुलबुली असून ती या भूमिकेला योग्य न्याय देऊ शकेल असे श्रीदेवीचेच म्हणणे आहे. श्रीदेवीने तिच्या एका मुलाखतीत याविषयी सांगितले देखील आहे. श्रीदेवी सांगते, या चित्रपटातील डबल रोलसाठी आलिया भट्ट ही एकच अभिनेत्री योग्य असल्याचे मला वाटते. त्याचसोबत आलिया भट्टने केलेल्या एका वक्तव्यावरून देखील ती चालबाज या चित्रपटाच्या रिमेकचा भाग असणार असल्याच्या चर्चांना ऊत आला आहे. तिने काही दिवसांपूर्वी मीडियाशी बोलताना सांगितले होते, जुडवा ३ या चित्रपटात मला देखील काम करण्याची संधी देण्यात यावी असे मी डेव्हिड धवन यांना सांगितले होते. पण जुडवा ३ या चित्रपटापेक्षा मी तुला एक चांगला रोल देईल असे त्यांनी मला कबूल केले आहे. पुढच्या वेळी मी त्यांना जुडवा ३ या चित्रपटाविषयी विचारेल तेव्हा जुडवा ३ मध्ये नव्हे तर चालबाजच्या रिमेकमध्ये माझ्यासोबत काम कर असे ते मला सांगतील याची मला खात्री आहे.आलियाच्या या वक्तव्यावरूनच चालबाजच्या रिमेकमध्ये तीच मुख्य भूमिकेत झळकणार असल्याची जोरदार चर्चा आहे. आलिया खरेच या चित्रपटाचा भाग आहे की नाही हे आपल्याला काहीच दिवसांत कळेल. Also Read : आलिया भट्टने शेअर केला बालपणीचा फोटो !!