Join us  

  डिप्रेशनमध्ये आहे ‘हा’ लोकप्रिय कॉमेडियन; म्हणाला, काय मी आधीसारखा जगू शकेल?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 01, 2019 10:56 AM

लोकप्रिय कॉमेडियन आणि लेखक तन्मय भटचे सोशल मीडियावर अनेक फॉलोअर्स आहेत. दीर्घकाळानंतर तन्मयने एक पोस्ट करून धक्कादायक माहिती दिली आहे.

ठळक मुद्दे तन्मय भट हा एआयबीचा सहसंस्थापक आणि सीईओ होता.

लोकप्रिय कॉमेडियन आणि लेखक तन्मय भटचे सोशल मीडियावर अनेक फॉलोअर्स आहेत. तन्मयने एआयबी ग्रूपच्या मदतीने डिजिटल कंटेटमध्ये स्वत:चा दबदबा निर्माण केला होता. अर्थात गतवर्षी ऑक्टोबरमध्ये  एआयबीचा सदस्य असलेल्या उत्सव चक्रवर्तीवर लैंगिक शोषणाचे आरोप झाले होते. ऑस्ट्रेलियातील क्रूझवर झालेल्या या शोषणाच्या घटनेला एका महिलेने वाचा फोडली होती. शिवाय उत्सवने एका अल्पवयीन मुलीसोबत गैरवर्तन केल्याचेही तिने म्हटले होते. मात्र या सगळ्याबाबत माहिती असूनही एआयबीचा तत्कालीन सीईओ  तन्मय भटने कारवाई केली नाही, असा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला होता. या संपूर्ण प्रकरणानंतर एआयबी या वादग्रस्त आणि तितक्याच चर्चित शोचा प्रसिद्ध चेहरा असलेल्या तन्मय भटने त्याच्या पदांचा राजीनामा दिला होता. तन्मय भट हा एआयबीचा सहसंस्थापक आणि सीईओ होता. यानंतर तन्मय भट जणू गायब झाला होता. दीर्घकाळानंतर तन्मयने एक पोस्ट करून धक्कादायक माहिती दिली आहे.

‘मी सध्या चिंतीत आहे. या स्थितीतून मी कधी बाहेर पडेल मला माहित नाही. पण बाहेर पडल्यावर या काळात मला पाठींबा देणा-या प्रत्येकाचे मी आभार मानणार आहे. लोक मला माझ्याबद्दल आणि एआयबीबद्दल विचारतात. माझ्या मते, ऑक्टोबरमध्ये जे झाले, त्यानंतर मी मानसिकदृष्ट्या खचलो आहे आणि ऑनलाईन व ऑफलाईन सोशल लाईफमध्ये योग्य भूमिका साकारू शकत नाहीये. गतवर्षी क्लिनिकल डिप्रेशनमध्ये असल्याचे डॉक्टरांनी मला सांगितले. सध्या तरी कंटेटवर काम करण्याच्या मन:स्थितीत मी नाही. गेल्या अनेक महिन्यांपासून अशीच स्थिती आहे. मी पुन्हा आधीसारखा सामान्य जीवन जगू शकेल का?असा प्रश्न मला पडतोय,’ असे तन्मयने लिहिले आहे.

टॅग्स :तन्मय भट