Join us

‘डेब्यूनंतर मुलीला दुसरा चित्रपट मिळविणे सोपे नव्हते’ पप्पा सुनील शेट्टीने सांगितले वास्तव!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2017 21:06 IST

अभिनेता सुनील शेट्टी याची मुलगी आथिया शेट्टी ‘मुबारका’ या चित्रपटातून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. सध्या या चित्रपटाच्या ...

अभिनेता सुनील शेट्टी याची मुलगी आथिया शेट्टी ‘मुबारका’ या चित्रपटातून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. सध्या या चित्रपटाच्या ट्रेलर आणि गाण्यांनी धूम उडवून दिली असून, प्रेक्षकांची त्यास प्रचंड पसंती मिळत आहे. कॉमेडीपट असलेल्या ‘मुबारका’मध्ये आथिया महत्त्वपूर्ण भूमिकेत बघावयास मिळणार आहे. सध्या ती या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असून, जागोजागी आथियाचा बोलबाला बघावयास मिळत आहे. आपल्या लेकीची ही धडपड बघून पप्पा सुनील शेट्टीला गहीवरून आले. त्याने म्हटले की, डेब्यूनंतर चित्रपट मिळविणे आथियासाठी खूप अवघड होते. वास्तविक सध्या बॉलिवूडमध्ये नेपोटिझमवरून बॉलिवूडमध्ये घमासान रंगले आहे. दररोज कुठल्या ना कुठल्या स्टार किड्सच्या डेब्यूच्या बातम्या समोर येत असल्याने, हा विषय चांगलाच चर्चिला जात आहे. मात्र बॉलिवूडचा सुपरस्टार सुनील शेट्टीचे या विषयावर वेगळेच मत आहे. त्याच्या मते, स्वत:च्या हिम्मतीवर त्याने बॉलिवूडमध्ये स्थान मिळविले आहे. इंडस्ट्रीत आउटसायडर असतानाही त्याने जे स्थान मिळविले आहे, त्यामुळेच त्याच्या मुलांना प्लॅटफॉर्म तयार झाला आहे. मग अशात यावर कोणाला काय अडचण असू शकते? त्याच्या मते, मुलगी आथियाचा बॉलिवूड प्रवेश सहज झाला नाही. त्यासाठी तिला प्रचंड मेहनत घ्यावी लागली. सुनील शेट्टीच्या मते, ‘अशाप्रकारची चर्चा खूपच त्रासदायक आणि दु:ख पोहोचविणारी आहे. कारण माझ्या मुलीसाठी बॉलिवूडमध्ये स्थिरावणे नक्कीच सोपे नव्हते. ४० कोटी रुपये खर्चून तिने पहिला चित्रपट केला, परंतु बॉक्स आॅफिसवर हा चित्रपट फ्लॉप ठरला. जेव्हा चित्रपट फ्लॉप होतो, तेव्हा कुठल्याही कलाकाराला त्यातून उभारी घेणे अवघड जाते. अशाच काहीशा प्रसंगाचा आथियालाही सामना करावा लागला. डेब्यूनंतर आथिया दुसरा चित्रपट करू इच्छित होती, परंतु तिला कोणीही चान्स देत नव्हते. त्यामुळेच मला असे वाटते की, नेपोटिझमवरील अनावश्यक चर्चा थांबायला हवी. कारण यामुळे मला खूप त्रास होतो. यावेळी सुनील शेट्टीने त्याचे म्हणणे पटवून देण्यासाठी एक सोपे उदाहरण सांगितले. सुनीलच्या मते, जो व्यक्ती ज्या प्रोफेशनमध्ये काम करीत असतो, त्याच प्रोफेशनमध्ये त्याच्या मुलांचेही भवितव्य घडवू इच्छितो. कारण त्या प्रोफेशनमधील बारीकसारीक गोष्टींविषयी तो जाणून असतो. मीदेखील माझ्या मुलांना अशा प्रोफेशनमध्ये पाठवू इच्छित नाही, ज्याविषयी मला काहीच माहीत नाही. कदाचित माझ्याप्रमाणे इतरही लोक हाच विचार करीत असावेत. एकूणच जर मी इंडस्ट्रीमध्ये योगदान दिले असेल तर माझ्या मुलींनीही इंडस्ट्रीमध्येच योगदान द्यावे, अशी माझी इच्छा असेल.