Join us  

अभिनेत्री सई ताम्हणकरच्या लॉकडाऊन चित्रपटाचा ट्रेलर आऊट

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2022 4:54 PM

मधुर भंडारकर यांनी दिग्दर्शित लॉकडाऊन सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटात सई ताम्हणकर महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

मधुर भंडारकर यांनी दिग्दर्शित लॉकडाऊन सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटात सई ताम्हणकरसह श्वेता बसु प्रसाद, आहाना कुमरा, प्रतीक बब्बर आणि प्रकाश बेलावडी यांच्या प्रमुख भूमिका आहेत, तर हृषिता भट कॅमिओमध्ये दिसणार आहे. 

ट्रेलरमध्ये दाखवल्यानुसार, श्वेता बसु प्रसाद मेहरुन्निसा या मुंबईतील कामाठीपुऱ्यातील एक सेक्स वर्कर स्त्रीच्या भूमिकेत आहेत. लॉकडाउनमुळे लादले गेलेले बदल तिला स्वीकारावे लागतात आणि आपला व्यवसाय ऑनलाइन करण्यासारख्या नव्या मार्गांचे प्रयोग करून बघणे भाग पडते. आहाना कुमरा मून आल्व्ह्ज या वैमानिकाच्या भूमिकेत आहे. या व्यक्तिरेखेला आकाशात उंचच उंच भराऱ्या घेण्याची सवय लागलेली असते, आणि अचानक अनेक महिने तिला जमिनीवरच राहणे भाग पडते. प्रथमच तिला आपले पंख कापले गेल्याची जाणीव होते. प्रतीक बब्बर हा माधव नावाच्या, तर सई ताम्हणकर फूलमती नावाच्या स्थलांतरित कामगारांच्या भूमिकांमध्ये आहेत. कोविड साथीमुळे त्यांचे उपजीविकेचे मार्ग बंद पडून उपासमार सुरू होते आणि रेल्वेगाड्या व स्थानिक वाहतूक बंद असल्यामुळे त्यांना आपल्या गावी चालत जाणे भाग पडते. आणि अखेरच्या कथेत प्रकाश बेलावडी नागेश्वरच्या एका वयोवृद्ध व्यक्तीच्या भूमिकेत आहेत. नागेश्वर एका वेगळ्याच शहरात अडकले आहेत आणि आयुष्यातील कठीण काळातून जाणारी त्यांची मुलगी वेगळ्याच शहरात आहे. भयभीत आणि हतबल असलेल्या या सर्वांपैकी कोण इंडिया लॉकडाउनच्या अनिश्चिततेतून मार्ग काढेल? हे आपल्याला चित्रपट पाहायलावर कळेल. 

सई ताम्हणकर म्हणाली, “हा चित्रपट वास्तववादी व भावनांनी परिपूर्ण आहे. प्रेक्षकांची नस ओळखणारे दिग्दर्शक मधुर भंडारकर यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली याबद्दल मी कृतज्ञ आहे. अभिनेत्यांमधील निरागसता बाहेर आणण्याची आणि त्यांना अगदी मूळ स्वरूपात व प्रांजळपणे व्यक्तिरेखा साकारण्यास सक्षम करण्याची क्षमता त्यांच्यात आहे.”

श्वेता बसु प्रसाद म्हणाली, "लॉकडाउनमुळे आलेली अनिश्चितता आपण सर्वांनीच अनुभवली, सेक्स वर्कर्सनेही ती अनुभवली. अशा वेगवेगळ्या भूमिका करायला मिळणे हे अभिनेत्री म्हणून खूपच भाग्याचे आहे. अर्थात मी संशोधन बरेच केले, मधुरसर आणि टीमने मला मुंबईतील कामाठीपुरा भागात नेले. तेथे मी काही देहविक्रय करणाऱ्या स्त्रियांना भेटले आणि त्यांची भाषा, देहबोली समजून घेतली. प्रत्येकाच्या लॉकडाउनमधील कथा सांगितल्या गेल्याच पाहिजेत.”

टॅग्स :सई ताम्हणकरमधुर भांडारकर