Join us  

बॉलिवूडमधील ही अभिनेत्री झाली अचानक गायब, आजही नाही लागला शोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2018 11:32 AM

रामसे ब्रदर्सने बॉलिवूडमधील एक काळ गाजवला होता असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. रामसे ब्रदर्सचे अनेक चित्रपट ऐंशी-नवव्दच्या ...

रामसे ब्रदर्सने बॉलिवूडमधील एक काळ गाजवला होता असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. रामसे ब्रदर्सचे अनेक चित्रपट ऐंशी-नवव्दच्या दशकात गाजले होते. त्यांच्या अनेक चित्रपटात प्रेक्षकांना जास्मीन ही अभिनेत्री पाहायला मिळाली होती. जास्मीनची त्या काळात चांगलीच चर्चा झाली होती. वीराणा या चित्रपटामुळे तर तिला चांगलीच प्रसिद्धी मिळाली होती.

जास्मीनने दिग्दर्शक एन.डी.कोठारी यांच्या सरकारी मेहमान या चित्रपटाद्वारे तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. या चित्रपटात विनोद खन्ना, अमजद खान यांच्या मुख्य भूमिका होत्या. या चित्रपटात जास्मीनची भूमिका प्रेक्षकांना आवडली होती. त्यामुळे एन.डी. कोठारी यांनीच तिला त्यांच्या डिव्होर्स या चित्रपटात काम करण्याची संधी दिली. जास्मीनने दोन चित्रपटात काम केले असले तरी तिला म्हणावी तशी प्रसिद्धी मिळाली नव्हती. पण रामसे ब्रदर्सच्या वीराणा या चित्रपटाने तिच्या करियरला एक वेगळेच वळण दिले. या चित्रपटात तिने भूताची भूमिका साकारली होती. आज इतकी वर्षं झाली असली तरी प्रेक्षकांच्या ती चांगलीच लक्षात आहे. या चित्रपटात जास्मीनची हॉट अदा प्रेक्षकांना पाहायला मिळाली होती. या चित्रपटात विजेंद्र घाटगे, गिरिश कर्नाड आणि शर्मिला टागोर यांच्या देखील मुख्य भूमिका होत्या. या चित्रपटामुळे जास्मीनला मिळालेल्या प्रसिद्धीमुळे तिला चांगलाच मनस्ताप झाला असल्याचे म्हटले जाते.

वीराणा या चित्रपटानंतर तिला अंडरवर्ल्डमधून फोन यायला लागले होते. तिच्याकडे अनेक जण शरीरसुखाची देखील मागणी करत असल्याचे म्हटले जात होते. या सगळ्यामुळे जास्मीन प्रचंड टेन्शनमध्ये आली होती. काय करावे हे तिला काहीच सुचत नव्हते. त्यामुळे या सगळ्या गोष्टींना कंटाळून तिने बॉलिवूडला रामराम ठोकला आणि त्यानंतर ती कायमची भारत सोडून गेली. ती अनेक वर्षांपासून अमेरिकेत राहात असून तिचे अमेरिकन व्यक्तिशी लग्न झाले आहे असे काहींचे म्हणणे आहे. तर काही जणांच्या मते ती जिवंत असल्याचा कोणताच पुरावा नाहीये. जास्मीन सध्या काय करतेय हे गूढ अद्याप उलगडलेले नाहीये. 

टॅग्स :जास्मीन