एखाद्या सार्वजनिक ठिकाणी जेव्हा भरदिवसा गोळीबार होतो तेव्हा आपली काय स्थिती होईल याची आपण कल्पनाही करु शकत नाही. नुकतंच बॉलिवूड अभिनेत्री अशा प्रसंगाला सामोरी गेली. शाहरुखच्या 'जवान' मध्ये भूमिका साकारणारी अभिनेत्री आलिया कुरेशी (Aaliyah Qureishi) नुकतीच थायलंडला गेली होती. तिथे एका मॉलमध्ये अचानक गोळीबार झाला. यातून ती आणि तिचे मित्र सुखरुप बाहेर निघाले. मात्र या घटनेने तिला चांगलाच धक्का बसला.
अभिनेत्री आलिया कुरेशी तिच्या मित्रपरिवारासोबत थायलंड ट्रीपवर गेली होती. तिने ट्रीपचे अनेक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले. दरम्यान एक दिवशी मॉलमध्ये फिरत असताना भीतीदायक प्रकार घडला. तिने पोस्ट करत लिहिले,'हे लिहिणं फार कठीण आहे. पण मला माझ्या सोशल मीडियावर सगळं छान छान लिहायचं नाही. काही धक्कादायक घडलं असेल तर तेही मला सांगायचं आहे. थायलंडमध्ये सियाम पॅरागॉन शूटिंगवेळी मी आणि माझे २ मित्र आम्ही त्या मॉलमध्येच होतो. एस्केलेटरवरुन जात असताना लोकांची पळापळ सुरु झाली. शूटर शूटर असं लोक ओरडायला लागले. गोळीबाराचा आवाज आला. तो खूपच धक्कादायक अनुभव होता.'
नशिबाने आम्ही त्या घटनेतून सुखरुप बाहेर निघालो. पण २ जणांचा त्यात मृत्यू झाल्याने मला खूप धक्का बसला. आयुष्य हे अॅक्शन फिल्मसारखं असलं असतं तर किती बरं झालं असतं. आम्ही बेधडकपणे अॅक्शन करुन इतरांचे प्राण वाचवले असते. पण जेव्हा अशी घटना घडते तेव्हा तिथून सुखरुप बाहेर निघायचं एवढंच आपल्या डोक्यात येतं. दिवसाची चांगली सुरुवात नंतर अशा पद्धतीने संपेल असं वाटलं नव्हतं. आयुष्यात अनपेक्षित घटना घडतात. '
आलियाच्या या पोस्टवर सर्वांनी तिला धीर दिला आहे. तसंच ती सुखरुप असल्याचा आनंद व्यक्त केला आहे. आलिया कुरेशीने 'जवान' सिनेमात 'झल्ली' ही भूमिका साकारली. यात तिच्या भूमिकेचं कौतुक झालं.