Join us  

अनेक वर्षांपासून गायब आहे बॉलिवूडमधील हा स्टार, ऋषी कपूर यांनी देखील त्याला शोधण्याचा केला होता प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2021 5:49 PM

80 च्या दशकापर्यंत मोठा पडदा गाजवणारा हा अभिनेता अचानक अंधारात गुडूप झाला. तो कुठे आहे, कुठल्या स्थितीत आहे, याची दखलही कुणी घेतली नाही.

ठळक मुद्दे‘कर्ज’मध्ये राज किरणसोबत काम करणारे ऋषी कपूर यांनीही त्याला शोधण्याचे प्रयत्न केला होता. 2011 मध्ये ऋषी कपूर राज किरणचा भाऊ गोविंद मेहतानी याला भेटले होते.

अर्थ या चित्रपटातील तुम इतना जो मुस्कुरा रहे हो...’ हे गाणे शबाना आझमी आणि अभिनेता राज किरण यांच्यावर चित्रीत करण्यात आले होते. राज किरणने कर्ज या चित्रपटात देखील महत्त्वाची भूमिका साकारली होती. 80 च्या दशकापर्यंत मोठा पडदा गाजवणारा हा अभिनेता अचानक अंधारात गुडूप झाला. तो कुठे आहे, कुठल्या स्थितीत आहे, याची दखलही कुणी घेतली नाही. दशकभरानंतर काहींना जाग आली. यानंतर अनेकांनी राज किरणचा शोध सुरू केला. या काळात कधी त्याच्या मृत्यूची अफवा उडाली. काहींनी तो मनोरूग्णालयात असल्याचे म्हटले तर काहींनी तो न्यूयॉर्कमध्ये टॅक्सी चालवताना दिसल्याचा दावा केला. पण राज किरण कधीच परतला नाही.

‘कर्ज’मध्ये राज किरणसोबत काम करणारे ऋषी कपूर यांनीही त्याला शोधण्याचे प्रयत्न केला होता. 2011 मध्ये ऋषी कपूर राज किरणचा भाऊ गोविंद मेहतानी याला भेटले होते. राज किरण गेल्या दहा वर्षांपासून अमेरिकेत अटलांटाच्या एका मनोरूग्णालयात असल्याची माहिती गोविंद यांनी ऋषी कपूर यांना दिली होते. भावाने दिलेल्या माहितीनुसार, राज किरणला पत्नीने धोका दिला. हा आघात राज किरणला सोसवला नाही आणि तो डिप्रेशनमध्ये गेला. पुढे त्याचे मानसिक संतुलन ढासळले. अर्थात राज किरणची पत्नी रूपाने हा दावा फेटाळून लावला होता.

काहींच्या मते, चित्रपटांमध्ये काम करणे कमी केल्यानंतर राज किरणची आर्थिक परिस्थिती ढासळली होती. डिप्रेशनवर उपचार घेताघेता त्याच्याजवळचे सगळे पैसे संपले होते. राज किरणची तब्येत खालावत असताना त्याची पत्नी रुपा मेहतानी आणि मुलगी ऋषिकाने त्याची साथ सोडली होती.

अभिनेत्री दिप्ती नवल यांनी राजसोबत अनेक चित्रपटात काम केले आहे. काही वर्षांपूर्वी दीप्ती यांनी फेसबुकवर एक पोस्ट लिहित राज किरणचा शोध घेण्याचा प्रयत्न केला होता. राज किरण हा अभिनेता सध्या न्यूयॉर्कमध्ये टॅक्सी चालवत असल्याचे मी काही लोकांकडून ऐकले आहे. कोणालाही त्याच्याविषयी काहीही माहिती असेल तर माझ्याशी त्वरित संपर्क साधावा, असे दीप्ती यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले होते. 1994 मध्ये राज किरण ‘रिपोर्टर’ या शेखर सुमनच्या मालिकेत अखेरचा दिसला होता.

टॅग्स :ऋषी कपूर