Join us  

अभिनयाचे गुरू रोशन तनेजा यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2019 10:17 AM

बॉलिवूडमधील बऱ्याच कलाकारांना अभिनयाचे धडे देणारे गुरू रोशन तनेजा यांचे शुक्रवारी रात्री निधन झाले.

बॉलिवूडमधील बऱ्याच कलाकारांना अभिनयाचे धडे देणारे गुरू रोशन तनेजा यांचे शुक्रवारी रात्री निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी मिथिका, मुलगा रोहित आणि राहुल असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर आज सांताक्रुझ येथील स्मशानभूमीत संध्याकाळी ४.३० वाजता अंत्यसंस्कार पार पडणार आहेत. 

रोशन तनेजा यांचा मुलगा रोहित तनेजा यांनी सांगितले की, माझ्या वडीलांचे काल रात्री साडे नऊ वाजता आमच्या राहत्या घरी दीर्घ आजाराने निधन झाले. रोशन तनेजा यांनी बॉलिवूडमधील शबाना आझमी, नसीरुद्दीन शहा, जया बच्चन, अनिल कपूर व शत्रुघ्न सिन्हा यांसारख्या दिग्गज कलाकारांना अभिनयांचे धडे दिले होते. भारतात ते बॉलिवूडमधील अभिनयाचे बेसिक ज्ञान व पाया घडविणारे प्रणिते म्हणून ओळखले जायचे. १९६० सालापासून ते अभिनयाचे प्रशिक्षण देत आहेत. सुरूवातीला त्यांनी पुण्यातील फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन इस्टिट्युट ऑफ इंडिया (एफटीआयआय)मधून अभिनयाचे ट्रेनिंग द्यायला सुरूवात केली आणि नंतर त्यांनी मुंबईत खासगी रोशन तनेजा स्कुल ऑफ अॅक्टिंगची इन्स्टिट्युट सुरू केली. अभिनेत्री शबाना आझमी यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आणि ट्विट केले की, रोशन तनेजा यांचे निधन झाल्याची खूप वाईट बातमी काल रात्री समजली. ते माझे एफटीआयआयमधील गुरू होते. त्यांचे आशीर्वाद घेतलेले ते एकमेव व्यक्ती होते. अभिनयाचे धडे मी त्यांच्याकडून गिरविले होते.

अभिनेता राकेश बेदी यांनी लिहिले की, माझ्यासाठी हा खूप वाईट दिवस आहे. माझे गुरू रोशन तनेजा यांचे काल निधन झाले. माझ्या कारकिर्दीचे सर्व श्रेय त्यांना जाते. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो.राष्ट्रीय पुरस्कार विजेते अतानु घोष यांनी ट्विटरवर म्हटले की, त्यांच्यासोबत पाच दशकांचा विलक्षण काळ अनंतात विलीन झाला. आपल्याला अभिनयासाठी लाभलेले ते सर्वोत्तम प्रशिक्षक होते. त्यांनी चार पिढ्यांमध्ये उत्तम कलाकार सिनेइंडस्ट्रीला दिला. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो.