Join us  

जेव्हा आमिर खान रोज घरी आल्यानंतर रडायचा...! ‘कयामत से कयामत’नंतर अशी झाली होती अवस्था

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2021 1:02 PM

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखल्या जाणा-या आमिरचा आज वाढदिवस. आज आमिर 56 वा वाढदिवस साजरा करतोय.

ठळक मुद्देआमिर सध्या ‘लाल सिंग चड्ढा’ या सिनेमात बिझी आहे. हा हॉलिवूडचा ‘फॉरेस्ट गम्प’ या चित्रपटाच्या रिमेक आहे.

आज आमिर खान बॉलिवूडचा सुपरस्टार म्हणून ओळखला जातो.  पण इथपर्यंतचा त्याचा प्रवास खचितच सोपा नव्हता. बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखल्या जाणा-या आमिरचा आज वाढदिवस. आज आमिर 56 वा वाढदिवस साजरा करतोय. आमिरचे आज फिल्म इंडस्ट्रीचे मोठे नाव आहे. ग्लॅमर, पैसा असे सगळे त्याच्याजवळ आहे. पण करिअरच्या एका वळणावर आमिर इतका हताश झाला होता की, घरी येऊन अनेकदा रडायचा.  खुद्द आमिरनेच याचा खुलासा केला होता.

आमिरने ‘होली’ या सिनेमातून आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली होती. पण त्याला खरी ओळख दिली ती ‘कयामत से कयामत’ या चित्रपटाने. या सिनेमानंतर आमिरला साईन करण्यासाठी निर्माता-दिग्दर्शकांची रांग लागली होती आणि त्याने 8 ते 9 सिनेमे साईन केले होते. पण यानंतर आमिर व्यथित होता आणि घरी येऊन रडत होता.

बेनेट युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांना संबोधित करताना आमिरने त्याच्या संघर्षाबद्दल सांगितले होते. तो म्हणाला होता, ‘कयामत से कयामत तक या सिनेमानंतर मी 8 ते 9 सिनेमे साईन केले होते. निश्चितपणे चांगल्या स्क्रिप्टचेच सिनेमे मी निवडले होते. पण त्यावेळी सर्व दिग्दर्शक माझ्यासाठी नवे होते. अशात माझा एकही सिनेमा चालणार नाही, अशा चर्चा मीडियात सुरू झाल्या होत्या. मला ‘वन फिल्म वंडर’ म्हटले जात होते. पण माझे करिअर  उद्धवस्त होत होते. मी 8-9 सिनेमे साईन करून घाई तर केली नाही? असा एकच प्रश्न मला छळत होता. मी खूप दु:खी होतो. अनेकदा तर मी घरी येऊन रडलो. अगदी ढसाढसा रडतो होतो.'

पुढे त्याने म्हटले होते की, ‘कयामत से कयामत तक’ या सिनेमानंतरची दोन वर्षे मी खूप दु:खात काढली. अक्षरश: मी हतबल झालो होता. मी साईन केलेले सिनेमे प्रदर्शनानंतर धडाधड फ्लॉप होत होते. आता सर्व काही संपले, असे त्याक्षणी मला वाटू लागले होते. आता बॉलिवूडमध्ये राहण्यात काहीही अर्थ नाही, असे मला वाटत होते. कारण माझे येणारे सिनेमेही फ्लॉप होणार, हे मी जाणून होतो.  अखेर मी निर्णय घेतलाच. करिअर उद्धवस्त झाले तरी चालेल. पण उत्तम दिग्दर्शक, उत्तम निमार्ता व उत्तम कथा मिळत नाही तोपर्यंत एकही सिनेमा साईन करणार नाही, असा निर्णय मी घेतला. 

‘वयाच्या 44 व्या वर्षी दिग्दर्शक व निर्माता राजकुमार हिरानी यांनी मला विद्यार्थ्याचा रोल आॅफर केला. मी एका स्टुडंटचा रोल कसा करू शकेन, असा प्रश्न मला पडला होता. पण मी हे आव्हान स्वीकारले आणि हा सिनेमाही स्वीकारला. सिनेमा हिट झाला, असेही त्याने सांगितले होते.’

 

आमिर सध्या ‘लाल सिंग चड्ढा’ या सिनेमात बिझी आहे. हा हॉलिवूडचा ‘फॉरेस्ट गम्प’ या चित्रपटाच्या रिमेक आहे. 1994 साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात टॉम हंक्स आणि रॉबिन राईट यांनी मुख्य भूमिका साकारली आहे.लाल सिंग चड्ढा या चित्रपटात जवळजवळ सत्तरीच्या दशकापासून आजपर्यंतचा काळ दाखवण्यात येणार आहे. यात आमिर सरदारजीच्या भूमिकेत दिसेल. 

टॅग्स :आमिर खान