Join us  

42 दिवसांत रिलीज होणार हे तीन मोठे सिनेमे; बॉक्सआॅफिसवर कोण मारणार बाजी?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2018 9:44 PM

 होय, या वर्षाअखेर तीन मोठे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. या तिन्ही चित्रपटांकडे प्रेक्षक डोळे लावून बसले आहेत.

या वर्षाच्या अखेरच्या दोन महिन्यात बॉक्सआॅफिसवर एकापेक्षा एक दमदार चित्रपटांची मेजवाणी सिनेप्रेमींना मिळणार आहे. होय, या वर्षाअखेर तीन मोठे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. या तिन्ही चित्रपटांकडे प्रेक्षक डोळे लावून बसले आहेत. हे तीन चित्रपट आहेत, ठग्स आॅफ हिंदोस्तान, 2.0 आणि झीरो. शानदार सिनेमॅटिक अनुभव देण्याचा दावा करणाऱ्या चित्रपटांबद्दल थोडे जाणून घेऊ यात...

सर्वात आधी जाणून घेऊ यात ठग्स आॅफ हिंदोस्तानबद्दल.आमिर खान आणि अमिताभ बच्चन यांच्यासारख्या महान अभिनेत्यांच्या अभिनयानाने सजलेल्या या चित्रपटावर यशराज फिल्म्सने पाण्यासारखा पैसा खर्च केला आहे. आजच या चित्रपटाचा लोगो रिलीज झाला. हा लोगो पाहता, हा चित्रपट चांगलाच भव्यदिव्य असणार, असे भासतेय. यशराज यांच्या थिएटरमध्ये मोठ्या स्क्रीनवर चित्रपटाचे एडिटींग केले जात आहे. मोठ्या पडद्यावर हा चित्रपट अधिकाधिक वास्तवदर्शी दिसावा, यासाठी हा प्रयोग केला जात आहे. येत्या ८ नोव्हेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे.

ठग्स आॅफ हिंदोस्तान रिलीज झाल्यानंतर बरोबर २० दिवसांनी शंकर दिग्दर्शित 2.0 चित्रपटगृहांत झळकणार आहे. या चित्रपटाच्या केवळ व्हीएफएक्स इफेक्टवर ५५० कोटी खर्च करण्यात आले आहे, यावरून त्याच्या भव्यदिव्यतेची कल्पना यावी. जगभरातील ३ हजार तंत्रज्ञांची मदत यासाठी घेतली गेली. या चित्रपटात रजनीकांत आणि अक्षय कुमार असे दोन सुपरस्टार आहेत. त्याशिवाय अक्षयचा लूक पाहून प्रेक्षकांची उत्सुकता ताणली गेली आहे. हा चित्रपट २९ नोव्हेंबरला रिलीज होतोय.

2.0 नंतर २२ दिवसांनी आनंद एल राय दिग्दर्शित झीरो हा चित्रपट बॉक्सआॅफिसवर धडकणार आहे. या चित्रपटात शाहरूख एका बुटक्या व्यक्तिची भूमिका साकारणार आहे. आत्तापर्यंत या चित्रपटाचे दोन टीजर रिलीज करण्यात आले. हे टीजर पाहून प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. शाहरूखशिवाय या चित्रपटात अनुष्का शर्मा आणि कॅटरिना कैफ लीड रोलमध्ये आहेत. सलमान खान यात कॅमिओ करताना दिसणार आहे. २१ डिसेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होतोय.

 

 

टॅग्स :ठग्स आॅफ हिंदोस्तान2.0झिरो सिनेमा