Join us

सलमानला दोषी ठरवल्यामुळे बॉलिवूड दु:खी

By admin | Updated: May 6, 2015 15:26 IST

हिट अँड रन प्रकरणी न्यायालयाने सलमानला दोषी ठरवले असून त्याचे कुटुंबिय, चाहते आणि बॉलिवूडवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ६ - हिट अँड रन प्रकरणी न्यायालयाने सलमानला दोषी ठरवले असून थोड्याच वेळात त्याला शिक्षा सुनावण्यात येणार आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे सलमानचे कुटुंबिय, चाहते आणि बॉलिवूडवर मात्र दु:खाचा डोंगर कोसळला आहे. सलमानला दोषी ठरवल्याचे कळल्यानंतर त्याच्या आीची प्रकृती बिघडली. त्यांना धीर देण्यासाठी  अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा, प्रीति झिंटा तसेच संगीत बिजलानी सलमानच्या घरी पोहोचल्या. अनेक सेलिब्रिटींनी या निर्णयाबद्दल दु:ख व्यक्त केले असून सलमानची पाठराखण केली आहे.
 
कोर्टाच्या निर्णयाबद्दल मला काहीच बोलायचे नाही. सलमान एक चांगला माणूस असून त्याचे स्वत:च्या देशावर खूप प्रेम आहे आणि न्यायव्यवस्थेबद्दल आदरही आहे. सर्वांना मदत करणारी व्यक्ती अशी सलमानची ओळख आहे. - अभिनेता वरूण धवन. 
 
अतिशय धक्कादायक बातमी, यावर काय बोलावं समजत नाही. कोणत्याही परिस्थितीत मी सलमानच्या पाठिशी उभी आहे. तो एक चांगली व्यक्ती असून त्याचा चांगुलपणा कोणीही हिरावून घेऊ शकत नाही - सोनाक्षी सिन्हा. 
 
खान कुटुंबियांच्या अतिशय कठीण काळात संपूर्ण कपूर परिवार त्यांच्यासोबत आहे - ऋषी कपूर.
 
मी कोर्टाच्या निर्णयाबाबत कुठलीही टिपण्णी करणार नाही, पण मला सलमानबद्दल नितांत आदर आहे सलमान खान हा फिल्म इंटस्ट्रीमधील दिलदार माणूस आहे. मला भेटलेला तो सर्वोत्तम व्यक्ती आहे. - रितेश देशमुख
 
तुमच्या जवळची व्यक्ती चुकीची असली तरी त्या व्यक्तीला शिक्षा झाल्यास दु:ख होतेच. आमचे तुझ्यावर प्रेम आहे आणि आम्ही  सदैव तुझ्या पाठीशी आहोत - आलिया भट्ट.
 
सलमानबद्दल मला सहानुभूती असून त्याला कमीत कमी शिक्षा व्हावी यासाठी मी प्रार्थना करेन असे अभिनेत्री हेमा मालिनी यांनी म्हटले आहे.