Join us

किकूवरच्या कारवाईचा बॉलीवूडने केला निषेध

By admin | Updated: January 16, 2016 04:47 IST

विनोदी अभिनेता किकू शारदावरील अटकेच्या कारवाईचा देशभरातील अभिनेते-कलाकारांनी निषेध केला आहे. बुधवारी किकूला हरियाणा पोलिसांनी अटक करून न्यायालयीन कोठडीत ठेवले.

विनोदी अभिनेता किकू शारदावरील अटकेच्या कारवाईचा देशभरातील अभिनेते-कलाकारांनी निषेध केला आहे. बुधवारी किकूला हरियाणा पोलिसांनी अटक करून न्यायालयीन कोठडीत ठेवले. किकूनं आध्यात्मिक गुरू बाबा गुरुमीत राम रहीम सिंग यांची टीव्ही शोमध्ये नक्कल करून त्यांच्या भक्तांच्या भावना दुखावल्याचा आरोप करीत त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली. याबाबत अनुपम खेर म्हणाले, अटकेची ही कारवाई अत्यंत घृणास्पद आहे. प्रत्येकाचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य अबाधित राहिलंच पाहिजे. आमच्या कलेवर अशी बंधनं कुणीही घालायला नकोत. मात्र, यासाठी मोदी सरकारला काही जण जबाबदार धरत आहेत. प्रत्येक गोष्टीसाठी मोदी सरकारला जबाबदार धरणं अत्यंत चुकीचं आहे. स्टँड अप कॉमेडियन वीर दास म्हणतो, अशा अटकेच्या कारवाया आपल्या देशाला शोभत नाहीत. आपल्या देशबांधवांना विनोदाची खरं तर चांगलीच जाण आहे. अशी घटना कधीही घडली नव्हती. किकूला अटक करण्यापूर्वी त्याबाबत त्याची साधी चौकशीही करण्यात आली नाही. चित्रपटनिर्माते सुधीर शर्मा म्हणाले, भावना दुखावण्यापेक्षा आपल्या भावना दुखावल्याचं नाटक करणाऱ्यांमुळेच अशा समस्या निर्माण होतात. खऱ्या श्रद्धाळूंना अशा गोष्टींशी काही देणेघेणे नसते. रणवीर शोरीनं टिष्ट्वट केलंय की, सध्याचे ‘बाबा’ लोक आपल्याला अ‍ॅक्शन हीरो म्हणून पेश करतात अन् विनोदी अभिनेत्यांना मात्र गजाआड टाकतात. यालाच ‘घोर कलियुग’ म्हणायचंय. तिकडे सिरसा येथील डेरा सच्चा सौदाचे प्रवक्ते पवन इन्सान यांनी या सर्व बाबींचं खंडन केलं आहे. ते म्हणतात, आमच्या गुरूंची नक्कल करताना त्यांनी मद्यप्राशन करतानाचा अभिनय किकू शारदानं केला होता. त्यामुळे आम्हासारख्या असंख्य भक्तांच्या भावना दुखावल्या आहेत. बाबांचे पाच कोटींहून अधिक भक्त आहेत. आपल्या गुरूचा असा झालेला अपमान कोण सहन करेल? किकूसारख्या कलाकारांना अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली जर अशा नकला करायच्या असतील, तर बाबांच्या भक्तगणांनाही त्याच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्याचा अधिकार आहे.