Join us  

डेंग्यूमुळे भूमी पेडणेकरची तब्येत बिघडली, रुग्णालयातील फोटो शेअर करत म्हणाली, "गेले ८ दिवस..."

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2023 1:38 PM

डेंग्यू झाल्याने भूमी पेडणेकर रुग्णालयात, फोटो शेअर करत म्हणाली, "एका डेंग्यूच्या मच्छरने मला..."

भूमी पेडणेकर ही बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. 'दम लगा के हैशा' या चित्रपटातून भूमीने २०१४ साली बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. पहिल्याच चित्रपटाने भूमीला लोकप्रियता मिळवून दिली. अनेक सुपरहिट चित्रपटात काम केलेली भूमी सध्या रुग्णालयात आहे. भूमीला डेंग्यूची लागण झाली आहे. रुग्णालयातील फोटो शेअर करत भूमीने ही माहिती चाहत्यांना दिली आहे. 

भूमीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन फोटो शेअर करत डेंग्यू झाल्याचं सांगितलं आहे. गेल्या आठ दिवसांपासून  भूमी मुंबईतील हिंदुजा हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. "एका डेंग्यूच्या मच्छरमुळे मी आठ दिवस त्रस्त आहे. पण, आज मी सकाळी उठल्यावर थोडं बरं वाटलं म्हणून सेल्फी काढला. प्लीज काळजी घ्या. मागील काही दिवस माझ्यासाठी आणि कुटुंबीयांसाठी कठीण होते. डासांना प्रतिबंध करणाऱ्या गोष्टी वापरा. रोगप्रतिकारक शक्ती वाढवा. वाढत्या प्रदुषणामुळे आपल्या रोगप्रतिकारक क्षमतेवर परिणाम होत आहे. माझ्या ओळखीतील काही लोकांनाही गेल्या काही दिवसांत डेंग्यूची लागण झाली आहे. एका अदृश्य डासाने हालत खराब केली आहे," असं भूमीने पोस्टमध्ये म्हटलं आहे. 

या पोस्टमधून भूमीने चाहत्यांना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. तसंच तिच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचे आभारही भूमीने पोस्टमधून मानले आहेत. तिच्या या पोस्टवर कमेंट करत चाहते तिला यातून बरं होण्यासाठी प्रार्थना करत आहेत. तर सेलिब्रिटींनीही कमेंट करत भूमीला काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. 

दरम्यान, अलिकडेच प्रदर्शित झालेल्या थँक्यू फॉर कमिंग या चित्रपटातून भूमी प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. भूमीने 'रक्षाबंधन', 'पती पत्नी और वो', 'गोविंदा मेरा नाम','बधाई हो', 'लस्ट स्टोरीज' या चित्रपटांत विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. 'लेडी किलर' या चित्रपटातून भूमी लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

टॅग्स :भूमी पेडणेकर सेलिब्रिटीडेंग्यू