Join us  

बॉलीवूडमधल्या स्टंटमनने पळवली 98 लाखांची ऑडी, चार तासांत अटक

By admin | Published: September 22, 2016 6:10 PM

बॉलिवूडमध्ये स्टंटमन म्हणून प्रसिद्ध असलेला आणि अनेक आघाडीच्या कलाकारांसाठी स्टंट करणा-या शमशेर खानला वरळी पोलिसांनी

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि.22- बॉलिवूडमध्ये स्टंटमन म्हणून प्रसिद्ध असलेला आणि अनेक आघाडीच्या कलाकारांसाठी स्टंट करणा-या शमशेर खानला वरळी पोलिसांनी अटक केली आहे. एका राजकारण्याच्या पत्नीची अलिशान कार त्याने चोरली होती. कुर्ला आणि वरळी पोलिसांनी एकत्र कारवाई करत केवळ चार तासातच त्याला अटक केली. 
 
शाहरूख खान,अक्षय कुमार, अजय देवगन यांसारख्या कलाकारांसाठी शमशेरने स्टंट केले आहेत. दिग्दर्शक रोहीत शेट्टीसोबतही अनेक चित्रपटांमध्ये त्याने स्टंट केले.  यागुन्ह्यात शमशेर सोबत अभय पाटील(42) आणि विजय वर्मा(35) या दोघांचा सहभाग होता. इंग्रजी वृत्तपत्र 'मिड डे'ने दिलेल्या वृत्तानुसार, वरळीमधील वैन गंगा या इमारतीतून शमशेरने अन्य दोन आरोपिंच्या मदतीने आभा बाफणा यांची 98 लाखांची ऑडी कार चोरली. कार चोरीला गेल्याचं लक्षात आल्यानंतर तात्काळ बाफणा यांनी वरळी पोलीस स्थानकात तक्रार केली. 
 
शमशेरला गाडी चोरी करण्यासाठी 2 लाख रूपये मिळणार होते. त्याला वर्माकडून चावी घेवून पार्किंगमधून गाडी चोरायला सांगण्यात आलं होतं. वर्माकडे चावी कशी आली याबाबत पोलीस अजून चौकशी करत आहेत. 
 
मंगळवारी रात्री 1 वाजेच्या सुमारास शमशेरने कार चोरली. सर्व काही ठरल्याप्रमाणे चाललं होतं काही वेळातंच चोरलेली गाडी घेऊन तो नवी मुंबईच्या रस्त्याला लागला. तिकडे अभय पाटीलकडे तो गाडी पोहोचवणार होता. मात्र वरळी पोलिसांच्या आधी कुर्ला पोलिसांना खान गाडी घेऊन नवी मुंबईला जात असल्याची टीप मिळाली. तेथील सहायक पोलीस निरीक्षक बढे यांनी कपाडिया नगर येथे नाकाबंदी करून खानची गाडी आडवली आणि विचारपूस करून त्याला अटक केली.
 
खान हा स्टंटमन असल्यामुळे खबरदारी म्हणून पोलिसांनी सर्व काळजी घेतली होती त्यामुळे पळ काढण्यात तो अपयशी ठरला. पोलीस स्टेशनमध्ये नेल्यावर त्याने गुन्हा कबूल केला. तिन्ही आरोपिंना पोलिसांनी अटक केली आहे.