Join us  

Bhau Bali Marathi Movie Review : मराठीतला 'भाऊ बळी' पाहण्याचा विचार करताय, तर एकदा वाचा हा रिव्ह्यू

By संजय घावरे | Published: September 16, 2022 7:25 PM

Bhau Bali Marathi Movie Review : जाणून घ्या कसा आहे, मनोज जोशी, किशोर कदम यांचा 'भाऊ बळी' चित्रपट

कलाकार : मनोज जोशी, किशोर कदम, मेधा मांजरेकर, रसिका आगाशे, राजन भिसे, रेशम टिपणीस, हृषिकेश जोशी, श्रीकर पित्रे, मानसी कुलकर्णी, प्रियदर्शनी इंदुलकर, अभय कुलकर्णी, पूर्णिमा तळवलकर, आशय कुलकर्णी, संतोष पवार, विजय केंकरेदिग्दर्शक : समीर पाटीलनिर्माते : नितीन वैद्य, निनाद वैद्य, अपर्णा पाडगावकरशैली : कॉमेडी, ड्रामाकालावधी : २ तास ८ मिनिटेस्टार - तीन स्टारचित्रपट परीक्षण - संजय घावरे

वस्ती आणि सोसायटीतील संघर्ष फार जुना आहे. सोसायटीत राहणाऱ्यांचं वस्ती वाल्यांवाचून कोणतंही काम होत नाही आणि पोटापाण्यासाठी वस्तीवाल्यांनाही सोसायट्यांचा आश्रय गरजेचा असतो, पण जेव्हा इभ्रतीचा प्रश्न निर्माण होतो, तेव्हा दोघेही एखाद्या योद्ध्याप्रमाणं एकमेकांवर वार करायला सज्ज होतात. या प्रसंगांमध्येही गंमत निर्माण करणारं कथानक या चित्रपटात आहे. समीर पाटील यांनी विनोदाचा काहीसा वेगळा जॅानर हाताळत विवित्र प्रसंगांद्वारे कधी हास्याची कारंजी फुलवली असून, कधी अंतर्मुख होऊन विचार करायला लावलं आहे.

कथानक : सोसायटीत राहणारे उच्च विद्याविभूषीत भाऊ आवळस्कर (मनोज जोशी)आणि जिजाबाई नगरात राहणाऱ्या दूधवाल्या बळीराम जंगम (किशोर कदम) यांच्यातील संघर्षाची ही कथा आहे. भाऊची पत्नी रमाबाई (मेधा मांजरेकर) बळीला प्रत्येक महिन्याला दूधाच्या बिलाचे पैसे देते, पण एक महिन्याचे पैसे न दिल्याचा आरोप बळी करतो. दोघेही आपापल्या म्हणण्यावर ठाम असल्यानं सोसायटी विरुद्ध वस्ती असा संघर्ष सुरू होतो. यात प्रत्येकजण आपापली बुद्धी पाजळत या युद्धात नवनवीन रणनीती आखतो. इन्स्पेक्टर धायमोडे (हृषिकेश जोशी) हे एक वेगळंच रसायन युद्धाच्या आगीत तेल ओतण्याचं काम करतं. या युद्धाचा अखेरीस काय परिणाम होतो त्याची खुमासदार गोष्ट या चित्रपटात आहे.

लेखन-दिग्दर्शन : जयंत पवार यांनी 'साशे भात्तर रुपयांचा सवाल अर्थात युद्ध आमुचे सुरु!' या कथेवर लिहिलेली पटकथा विविध पैलूंवर प्रकाश टाकणारी आहे. समीर पाटील यांनी आपल्या नेहमीच्याच शैलीत दिग्दर्शन करत विविध मुद्द्यांना स्पर्शही केला आहे.व्यक्ती तशा प्रकृती या चित्रपटात पहायला मिळतात. राईचा पर्वत करणारी नमुनेदार कॅरेक्टर्स आणि सोसायटीसोबतच वस्तीतही घडणाऱ्या घटनांची बित्तंबातमी पोहोचवणारं लोकल केबल चॅनेल यांनी सिनेमात रंगत आणली आहे. कथेचा जीव फार मोठा नसला तरी ती विविध प्रसंगांद्वारे रंगवण्यात आली आहे. ठराविक अंतरानं नाटयमय वळणांची पेरणी करण्यात आली आहे. एक छोटासा मुद्दाही कशाप्रकारे दोन गटांमध्ये संघर्ष निर्माण करू शकतो ते दाखवण्यात आलं आहे. मध्यंतरापूर्वी बऱ्याच ठिकाणी चित्रपट हसवतो, पण उत्तरार्धामध्ये काही लांबलचक प्रसंगांमुळं मोठा वाटू लागतो. सोसायटीमध्ये तोडफोड करणाऱ्या वस्तीतील मुलांना पोलीस शोधत असतात, पण नंतर त्यांची मोहिम थंडावते आणि हल्ला करणारी मुलं मुक्तपणे फिरू लागतात अशा काही उणीवा राहिल्याचं जाणवतं. दूध बिलापासून सुरू झालेला संघर्ष वैयक्तीक पातळीवर पोहोचल्यावर चित्रपट कट-कारस्थान आणि सूडबुद्धीसारख्या झोनमध्ये जातो. शेवट अपेक्षेपेक्षा खूप वेगळा झाल्यानं निराश करतो. 'जिंकू किंवा मरू' या गाण्याचा लीलया वापर करण्यात आला आहे. तांत्रिकदृष्ट्या चित्रपट सक्षम आहे. कॉश्च्युम आणि गेटअपपासून कला दिग्दर्शनापर्यंत सर्वच बाजूंवर बारकाईनं लक्ष दिलं आहे.

अभिनय : कलाकारांची तगडी फळी असल्यानं एकप्रकारे अभिनयाची जुगलबंदीच पहायला मिळते. शिक्षण आणि उच्चभ्रू सोसायटीत राहण्याचा माज असणाऱ्या भाऊची भूमिका मनोज जोशी यांनी अगदी सहजपणे साकारली आहे. त्याला कित्येकदा तितक्याच सहजपणे तर कधी आक्रमक होऊन प्रत्युत्तर देत किशोर कदम यांनी बळीराम वठवला आहे. शीर्षक भूमिकेतील दोन तगड्या कलाकारांनी रंगत आणली आहे. मेधा मांजरेकरांनी महत्त्वपूर्ण व्यक्तिरेखा कोणताही बडेजाव न करता सादर केली आहे. बळीच्या पत्नीच्या भूमिकेत रसिका आगाशेनंही चांगलं काम केलं आहे. हृषिकेश जोशीनं साकारलेला इन्स्पेक्टर यापूर्वी बऱ्याचदा साकारलेल्या व्यक्तिरेखांची आठवण करून देतो. राजन भिसे, विजय केंकरे यांनी साकारलेले निवृत्त न्यायाधीश आणि विचारवंत छान झाले आहेत. संतोष पवारची छोटीशी व्यक्तिरेखाही चांगली आहे. मानसी कुलकर्णी, आशय कुलकर्णी, अभय कुलकर्णी, पूर्णिमा तळवलकर, प्रियदर्शनी इंदुलकर, श्रीकर पित्रे या सर्वांची चांगली साथ लाभली आहे.

सकारात्मक बाजू : खुमासदार गोष्ट, अफलातून अभिनय, दिग्दर्शन, युद्धप्रशिक्षणावरील गाणं, सिनेमॅटोग्राफीनकारात्मक बाजू : मर्यादित वाटणाऱ्या गोष्टीचा जीव, मध्यंतरानंतरची काही दृश्ये, सादरीकरण, क्लायमॅक्सथोडक्यात : डोक्याला फार ताप न देता प्रेक्षकांचं हलकं-फुलकं मनोरंजन करण्याचा केलेला हा प्रतत्न अनाहुतपणे बऱ्याच मुद्द्यांवर भाष्य करणारा असल्यानं एकदा तरी पहायला हवा.

टॅग्स :मनोज जोशीकिशोर कदममेधा मांजरेकररेशम टिपणीस